भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या BCCI ने अर्ज मागवले आहेत. या पदासाठी पात्रतेचे निकष ठरवून देण्यात आल्यानंतर अनेक इच्छुक माजी क्रिकेटपटूंनी या पदासाठी अर्ज केले असल्याची चर्चा आहे. सध्या असलेले प्रशिक्षक रवी शास्त्री हे या पदावर कायम राहणार की नवे प्रशिक्षक भारतीय क्रिकेट संघाला लाभणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दरम्यान कर्णधार विराट कोहली याने मात्र प्रशिक्षकपदी कोणाला पसंती असावी याबाबत स्पष्ट केले आहे.
“क्रिकेट सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप मला या संदर्भात काहीही विचारलेले नाही. जर त्यांना माझे मत हवे असेल तर मी त्यांना नक्कीच मदत करेन. मी स्वतः जाऊन त्यांच्याशी संवाद साधेन. रवी शास्त्री यांच्याबाबत जर बोलायचे झाले तर आमच्या संघाचा आणि त्यांचा चांगला मेळ जुळला आहे. त्यामुळे त्यांनाच या पदावर कायम ठेवण्यात आले तर मला आनंदच आहे. पण प्रशिक्षक निवडणाऱ्या समितीने अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही”, अशी कोहलीने स्पष्ट केले.
भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने रोहित शर्मा बरोबर मतभेद असल्याचे वृत्तही फेटाळून लावले. “मी सुद्धा बातम्यांमधून रोहित शर्मा बरोबर माझे मतभेद झाल्याचे ऐकले आहे. यशस्वी होण्यासाठी ड्रेसिंग रुममधले वातावरण खूप महत्वाचे असते. रोहित बरोबर मतभेदाचे वृत्त खरे असते तर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो”, असे विराटने स्पष्ट केले.
“ड्रेसिंग रुममधले वातावरण खराब असते तर संघाला इतका चांगला खेळ करता आला नसता. जर मला एखादी व्यक्ती आवडत नसेल, तर ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसले असते. मी नेहमीच रोहितचे कौतुक केले आहे. या अशा अफवा पसरवून कोणाला फायदा होणार, ते माहिती नाही”, अशा शब्दात त्याने हे वृत्त फेटाळून लावले.
