विश्वविक्रमांचा राजा सचिन तेंडुलकरने अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांच्यावर सहजगत्या मात करून ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या मागील दोन दशकांमधील पिढीतील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले. भारताचा माजी कसोटीपटू राहुल द्रविड, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो आणि क्रिकेट समीक्षक संबित बाल यांच्यासह ५० सदस्यीय समितीने या पुरस्कार विजेत्याची निवड केली. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताने सर्वाधिक पुरस्कार मिळवून बाजी मारली.
‘‘मी नि:शब्द झालो आहे. मला पिढीतील सर्वोत्तम पुरस्कार ठरवल्याबद्दल धन्यवाद. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीमध्ये पंचांचाही समावेश करावा, अशी मी सूचना करतो. कारण ते आम्हाला सर्वात जवळून पाहतात,’’ असे सचिनने पुरस्कार स्वीकारताना सांगितले. ट्वेन्टी-२०चा जमाना असल्यामुळे मी मोठे भाषण करणार नाही, असे मिस्कीलपणे तो पुढे म्हणाला. परंतु या वेळी त्याने जॅक कॅलिस, शेन वॉर्न आणि अन्य काही खेळाडूंसोबत खेळतानाच्या आठवणी ताज्या केल्या.
कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीसाठी मिचेल जॉन्सनला तर फलंदाजीसाठी शिखर धवनला गौरवण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शाहीद आफ्रिदी सर्वोत्तम गोलंदाज तर रोहित शर्मा सर्वोत्तम फलंदाज ठरला. सर्वोत्तम पदार्पणवीराचा पुरस्कार भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीला देण्यात आला. याचप्रमाणे प्रशिक्षक तारक सिन्हा यांना क्रिकेटमधील योगदानासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
पिढीतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान सचिन तेंडुलकरला
विश्वविक्रमांचा राजा सचिन तेंडुलकरने अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांच्यावर सहजगत्या मात करून ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या
First published on: 15-03-2014 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar voted cricketer of the generation