आशियाई कनिष्ठ आणि कॅडेट टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईतील एनएससीआयमध्ये जगभरातल्या टेबल टेनिसपटूंचा कुंभमेळा भरणार आहे. १२ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून, जगभरातले अव्वल २०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मुंबईला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. कनिष्ठ आणि कॅडेट गटात एकेरी, दुहेरी आणि सांघिक अशा प्रकारात ही स्पर्धा रंगणार आहे. कनिष्ठ गटासाठी १८ वर्षांखालील तर कॅडेट गटासाठी १५ वर्षांखालील वयोगट निश्चित करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेने राज्य टेबल टेनिस संघटना, भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. संयोजन समितीचे सचिव, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी खेळाडू कमलेश मेहता यांनी स्पर्धेबाबत अधिक माहिती दिली.
कनिष्ठ गटातील अव्वल चार खेळाडू ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत शांघाय, चीन येथे होणाऱ्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. अव्वल पाच संघांनाही ही संधी मिळणार आहे. कॅडेट गटातील खेळाडूंना बार्बाडोस येथे होणाऱ्या जागतिक कॅडेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरता येणार आहे.
भारतीय संघ : कनिष्ठ गट : अभिषेक यादव, लालरिनपुनिआ, उत्कर्ष गुप्ता, सभ्या विरमानी, बोरो बर्डी, अनिरबन घोष, निशाद शाह. मुली : सागरिका मुखर्जी, अयाहिका मुखर्जी, देब ऐश्वर्या देब, प्रियदर्शिनी दास, श्रीजा अकुला, रिती शंकर. कॅडेट मुले : विकास ठक्कर, आकाश नाथ, रफीक फिडेल, स्नेहित सुरुवाजला, जीत चंद्रा. कॅडेट मुली : नैना, श्रुती अमृते, अर्चना कामथ, अभिन्या रमेश, ऐश्वर्या पाठक.