प्रशांत केणी prashant.keni@expressindia.com
टेनिस क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या त्रिमूर्तीमध्ये नोव्हाक जोकोव्हिच हा वेगळा आहे. एकीकडे ग्रँडस्लॅम जेतेपदांचे इमले रचणारा हा अवलिया दुसरीकडे आपल्या अतरंगी स्वभावाने ‘जोकर’ हे नाव सार्थ ठरवतो. कधी मैदानी विनोद करीत टेनिस चाहत्यांच्या टाळय़ा मिळवतो, तर कधी वादग्रस्त कृतीने जगाचे लक्ष वेधतो. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकारच्या लसीकरण या अटीविरोधातील त्याच्या लढय़ाने आता तो कोर्ट-कचाटय़ात अडकला आहे. परंतु जोकोव्हिचच्या या नवनाटय़ाने त्याच्या कारकीर्दीत आणखी एका वादाची नोंद मात्र नक्की झाली आहे.
जोकोव्हिच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या त्रिकुटाचे टेनिसमधील वर्चस्व अद्यापही अबाधित आहे. या तिघांपैकी कोणत्याही दोघांमधील सामना हा चाहत्यांसाठी पर्वणी ठरतो. त्यांच्या दीर्घ रॅलीज डोळय़ांचे पारणे फेडतात. या तिघांच्याही खात्यांवर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जमा आहेत. त्यामुळे २१वे विश्वविक्रमी जेतेपद आणि क्रमवारीतील अग्रस्थान तिघांनाही साद घालते आहे. गतवर्षी अमेरिकन स्पर्धेच्या जेतेपदासह फेडरर आणि नदालला मागे टाकण्याची संधी चालून आली होती. पण डॅनिल मेदवेदेवकडून अंतिम लढत गमावल्यानंतर करिअर ग्रँडस्लॅम जेतेपदाचे त्याचे स्वप्नही थोडक्यात हुकले. तेव्हाही शांतपणे अपयश पचवेल, तो जोकोव्हिच कसला? जोकोव्हिचने आक्रस्ताळीपणे रॅकेट तोडले आणि मग टॉवेल डोक्यावर घेऊन ओक्साबोक्शी रडू लागला. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे २०२०मधील अमेरिकन स्पर्धा जोकोव्हिचने आपल्या आततायीपणामुळे गाजवली होती. पाब्लो कॅरेनो बुस्टाविरुद्धच्या सामन्यात जोकोव्हिचने रागाच्या भरात अनवधानाने चेंडू टेनिस रॅकेटने जोरात सीमारेषेवरील महिला पंचाच्या दिशेने भिरकावला. तो त्यांच्या घशावर आदळल्याने त्यांना दुखापत झाली. त्यामुळे जोकोव्हिचची संयोजकांनी स्पर्धेतून हकालपट्टी केली होती. रॅकेट आणि चेंडूवर राग व्यक्त करण्याची ही सवय जुनी असल्याचे भाष्य जोकोव्हिचने मग पत्रकार परिषदेत केले.
टेनिस कोर्टवरील आपल्या अफाट क्षमतेच्या खेळाने जगावर मोहिनी घालणाऱ्या जोकोव्हिचमध्ये दडलेल्या नकलाकाराचा शोध सर्वप्रथम २००७मध्ये लागला. अमेरिकन स्पर्धेच्या लॉकररूममध्ये त्याने फेडरर, नदाल, अँडी रॉडिक आणि मारिया शारापोव्हा या नामांकित टेनिसपटूंच्या नकला केल्या. तेव्हा जोकोव्हिच फक्त २० वर्षांचा होता. जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. तर कारकीर्दीतील पहिल्याच ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यामध्ये रॉजर फेडररकडून पराभूत झाला होता. २०१४च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत कोर्टवरील सूत्रसंचालक जिम कुरियरच्या विनंतीवरून जोकोव्हिचने माजी टेनिसपटू आणि त्याचे प्रशिक्षक बोरिस बेकर यांच्या नकलांनी सर्वाना हसवले होते. २०१९मध्ये जोकोव्हिचने रॅकुटेन जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने टोक्योतील प्रथितयश सुमो आखाडा गाठून तेथील भीमकाय शरीरयष्टीच्या मल्लांसह मनोरंजन केले होते. खेळापलीकडची त्याची ही प्रतिभा अनेकदा लक्षवेधी ठरली.
वैद्यकीय कारणास्तव सामन्यातून विश्रांती घेत प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खेळावर परिणाम करण्याची जोकोव्हिचची क्लृप्तीसुद्धा अनेकदा चर्चेत आली. २००८च्या अमेरिकन स्पर्धेतील रॉडिकविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात जोकोव्हिचने दोनदा वैद्यकीय कारणास्तव व्यत्यय आणला आणि मग सामना जिंकला. त्यामुळे संतप्त रॉडिकने ‘‘जोकोव्हिचला दोन घोटय़ाच्या दुखापती, बर्ड फ्लू आणि संसर्गजन्य रोग आहे,’’ अशी टिप्पणी केली होती. २०२०च्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत जोकोव्हिचच्या वैद्यकीय विसाव्यावर बुस्टाने टीका केली होती. ‘‘प्रत्येकदा सामना रंगतदार अवस्थेत असतो, तेव्हा जोकोव्हिच वैद्यकीय साहाय्य घेतो,’’ असे बुस्टाने म्हटले होते. कारण या विश्रांतीनंतर जोकोव्हिचने सामना जिंकला.
२०२०मध्ये दी एड्रिया टूर या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेमुळे जोकोव्हिच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. करोना साथीमुळे एटीपी स्पर्धा स्थगित असताना जोकोव्हिचने मदतनिधीसाठी या स्पर्धेचा घाट घातला. परंतु या स्पर्धेनंतर जोकोव्हिचसह अनेक नामांकित टेनिसपटूंना करोनाची लागण झाली होती.
जोकोव्हिच आता ३४ वर्षांचा आहे. वयाची चाळिशी आणि दुखापतींचा ससेमिरा यामुळे निवृत्तीकडे झुकलेल्या फेडररनंतरही आणखी काही वर्षे तो सहज खेळू शकेल. या तिहेरी स्पर्धेतील नदालची मक्तेदारी लाल मातीवर अधिक प्रकर्षांने जाणवते. म्हणजेच जोकोव्हिचला एकीकडे श्रेष्ठत्वाकडे जाण्याची नामी संधी आहे. परंतु स्वभावदोषामुळे तो आपल्या कारकीर्दीचे नुकसान करीत आहे.
आता सोमवारी लसीकरण वादाप्रकरणी न्यायालयाची सुनावणी होईल. वैद्यकीय कारणांनी सवलत हा आधार घेऊन लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे न घेण्यात आल्यास त्याला यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेला तर मुकावे लागेलच, शिवाय त्याच्यावर तीन वर्षांची प्रवेशबंदी लागू शकेल. गेल्या महिन्यात जोकोव्हिचला करोनाची लागण झाल्याचा दावा त्याच्या वकीलाने न्यायालयात केला आहे. यात तथ्य आहे की, धार्मिक कारणास्तव तो लस टाळतो आहे, याचीही चर्चा सुरू आहे.
तूर्तास, जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन स्पर्धा एकूण १०व्यांदा आणि सलग चौथ्यांदा जिंकू शकणार नाही. आपल्या वृत्तीपायी २१ ग्रँडस्लॅमचा विक्रम गाठण्याची संधी सध्या तरी त्याला हुलकावणी देण्याची दाट शक्यता आहे.