ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे तासन्तास चालणारा मुकाबला.. प्रत्येक गेम आणि सेटगणिक बदलणारी समीकरण.. पारंपारिक टेनिसचे हे रूढ चित्र जाहिरातधिष्ठित बाजारासाठी प्रतिकूल.. म्हणूनच टेनिसविश्वातल्या दिग्गजांना एकत्र आणणाऱ्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) स्पर्धेत खेळाचा कालावधी कमी करून अनोखे नियम तयार करण्यात आले आहेत. एकेरी असो की दुहेरी-प्रत्येक लढत केवळ एका सेटचीच असेल. त्यामुळे थोडय़ा वेळात परिस्थितीशी जुळवून घेत जिंकण्याचे आव्हान खेळाडूंसमोर असेल. परंतु या विजयापेक्षा गेमद्वारे मिळणारे गुण महत्त्वाचे असल्याने प्रत्येक फटका निर्णायक ठरू शकतो.
सामना निकाली होण्यासाठी टायब्रेकरऐवजी ‘शूटआऊट’ तसेच ‘सुपर शूटआऊट’ असणार आहे. पाच मिनिटांच्या कालावधीत सर्वाधिक गुण जिंकणारा खेळाडू विजेता ठरणार असल्याने प्रेक्षकांसाठी रंजकता वाढली आहे. ‘शॉटक्लॉक’ ही संकल्पना राबवत खेळ आणि खेळाडूंना वेळेची वेसण घालण्यात आली आहे. सव्र्हिस, शूटआऊट, चेंजओव्हर्स, टाइमआऊट्स या प्रत्येकवेळी ही ‘टिक.. टिक ..’ सुरू होईल आणि वेळ न पाळल्यास संघांचे गुण वजा होणार आहेत. झटपट गेमचे गुण पटकावण्यासाठी सव्र्हिस परतवणाऱ्या खेळाडूला ‘पॉवरपॉइंट’ची अर्थात पुढच्या गुणावर दुप्पट गुण मिळवता येऊ शकतो. याचप्रमाणे सेटदरम्यान खेळाडूला मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक-व्यवस्थापन ‘टाइमआऊट’ची मागणी करू शकतात.
‘‘दूरचित्रवाणी प्रक्षेपण आकर्षक व्हावे आणि खेळ वेगवान होईल, या उद्देशाने नियमांत बदल करण्यात आले आहेत. खेळाडूंना हे स्वरूप आवडते आहे. लीगच्या निमित्ताने प्रेक्षकांना खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी वाद्ये वाजवणे, घोषणाबाजी करता येऊ शकते. नव्या हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने या लीग उपयुक्त आहेत,’’ असे राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2014 रोजी प्रकाशित
‘रॅकेट’रंजकतेसाठी नियमांना फोडणी
ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे तासन्तास चालणारा मुकाबला.. प्रत्येक गेम आणि सेटगणिक बदलणारी समीकरण..

First published on: 05-12-2014 at 05:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis racket rules