थायलंड खुलीबॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; आज यामागुचीचे आव्हान

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. किदम्बी श्रीकांत, मालविका बनसोडसह अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे आता भारताच्या आशा एकमेव सिंधूवर अवलंबून आहेत. सहाव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या उबर चषक जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिम यू जिनचा ३७ मिनिटांत २१-१६, २१-१३ असा पराभव केला. सिंधूने सलामीच्या सामन्यात अमेरिकेच्या लॉरेन लॅमला नामोहरम केले होते.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या द्वितीय मानांकित अकाने यामागुचीशी गाठ पडणार आहे. यामागुचीने कोरियाच्या किम गा ईऊनला २१-२३, २१-१५, २१-१६ असे पराभूत केले. सिंधू यामागुची हिचा २३व्या लढतीत सामना करणार आहे. आतापर्यंत सिंधूने १३-९ असेविजयमिळवले आहेत. याआधी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यामागुचीने पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूविरुद्ध सामना जिंकण्याची किमया साधली होती.

महिला एकेरीत बनसोडने डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफरसनशी झालेल्या सामन्यात २१-१६, १४-२१, १४-२१ असा पराभव पत्करला. मिश्र दुहेरीत इशान भटनागर आणि तनिशा क्रॅस्टो जोडीचे आव्हानही संपुष्टात आले. मलेशियाच्या सहाव्या मानांकित गोह सून ह्यूट आाणि लाय शेव्हॉन जेमी जोडीकडून त्यांनी १९-२१, २०-२२ अशी निसटती हार पत्करली. याचप्रमाणे अश्विनी भट के आणि शिखा गौतम जोडीला पाचव्या मानांकित मायू मॅटसुमोटो आणि वाकाना नागाहारा जोडीने २१-१९, २१-६ असे पराभूत केले.

श्रीकांतची माघार

भारताच्या थॉमस चषक जेतेपदाचा प्रमुख शिल्पकार किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आर्यलडच्या एहॅट एनग्युएनला पुढे चाल देण्यात आली. श्रीकांतने स्पर्धेतून माघार घेतल्याचे कारण समजू शकले नाही. जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावरील श्रीकांतने सलामीच्या लढतीत फ्रान्सच्या ब्रिस लेव्हरडेझला नमवले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thailand open badminton tournament indus semifinals yamaguchi challenge today ysh

Next Story
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अव्वल दोन स्थानांचे राजस्थानचे लक्ष्य!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी