वृत्तसंस्था, जकार्ता : जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सुकांत कदमने पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगतच्या साथीने खेळताना थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. एकेरीत प्रमोद आणि सुकांत यांनी प्रत्येकी रौप्यपदके पटकावली.
सुकांत-प्रमोद जोडीने एसएल३-एसएल४ विभागातील पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत द्वितीय मानांकित ड्वियोको ड्वियोको आणि फ्रेडी सेटिवान जोडीचा २९ मिनिटांत २१-१८, २१-१३ असा पराभव केला. सुकांतचे हे कारकीर्दीमधील दुहेरीतील दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी त्याने २०१८मध्ये युगांडा येथील स्पर्धेत विक्रम कुमारच्या साथीत सुवर्ण कामगिरी केली होती.
एसएल४ विभागातील एकेरीच्या अंतिम लढतीत सुकांतला द्वितीय मानांकित फ्रान्सच्या लुकास मझूरकडून २-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे इंग्लंडच्या डॅनियल बेथॉलने प्रमोदवर २१-१३, २१-१९ अशी मात केली.
एसएल३ विभागातील महिला एकेरीत मनदीप कौरने भारताच्याच मानसी जोशीला २०-२२, २१-१९, २१-१४ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले. तसेच एसयू५ विभागातील अंतिम लढतीत मनीषा रामदासने जपानच्या कायडे कामेयामावर २०-२२, २१-१२, २१-१९ अशी सरशी साधली.