भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये झाला. अभूतपूर्व कामगिरी करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात पराभवाचं पाणी पाजलं. ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. अशातच सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची जबरदस्त खिल्ली उडवली. त्याने ट्विट करुन टीम पेनला चिमटा काढलाय.

सिडनीत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी २५९ चेंडू खेळून काढत सामना अनिर्णीत राखला. अश्विन-हनुमा विहारी जोडाला फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघानं बेंबीच्या देटापर्यंत प्रयत्न केले. अश्विन फलंदाजी करत असताना ‘गाबा कसोटीत तुला बघण्यासाठी खूपच आतूर आहे…’ असं म्हणत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने अश्विनला डिवचलं होतं. त्यावर त्याचवेळी अश्विननेही ‘तू भारतात ये… मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची मालिका असेल’ असं प्रत्युत्तर देऊन पेनची बोलती बंद केली होती. त्यानंतर आता गाबा कसोटीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने टीम पेनला टोला लगावलाय.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

“गाबामधून गुड इव्हिनिंग…मी इथे सामना खेळू शकलो नाही त्यासाठी माफी मागतो…पण आमचं आदरातिथ्य केल्याबद्दल आणि खडतर काळात चांगलं क्रिकेट खेळल्याबद्दल धन्यवाद…ही मालिका आम्हाला आयुष्यभर आठवणीत राहिल”… असं खोचक ट्विट अश्विनने केलंय. हे ट्विट करताना अश्विनने टीम पेनला आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत अकाउंटलाही टॅग केलं आहे.

आणखी वाचा- “ते 36 वर आउट झाले होते…आपण 44 वर…टीम इंडियाच्या विजयात लपलाय काँग्रेससाठी संदेश”

दरम्यान, विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. मालिकेत २-१ अशा विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर करंडक राखलाच, शिवाय आयसीसी कसोटी स्पर्धा गुणतक्त्यात अव्वल स्थानावरही झेप घेतली.