कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीबाबत श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर थरिंदू कौशलवर ठपका ठेवण्यात आला आहे.
‘‘श्रीलंकेच्या क्रिकेट व्यवस्थापनाकडे सादर करण्यात आलेल्या सामनाधिकाऱ्यांच्या अहवालात २२ वर्षीय कौशलच्या गोलंदाजीच्या शैलीच्या योग्यतेबाबत चिंता प्रकट करण्यात आली आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे.
कौशलने भारताविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी दाखवली. त्याने तीन कसोटी सामन्यांत १३ बळी मिळवले. यापैकी गॉलमध्ये श्रीलंकेने मिळवलेल्या विजयातील ८ बळींचा समावेश आहे.
‘‘संशयास्पद गोलंदाजी शैलीबाबत आयसीसीच्या प्रक्रियेनुसार आता कौशलच्या गोलंदाजीच्या शैलीची पडताळणी होईल. येत्या १४ दिवसांत कौशलला या चाचणीला सामोरे जाणे बंधनकारक आहे. सदर चाचणीचा निर्णय उपलब्ध होईपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास परवानगी असेल,’’ असे आयसीसीने म्हटले आहे.
चेन्नईत असलेल्या श्री रामचंद्र विद्यापीठ या आयसीसीची मान्यता असलेल्या चाचणी केंद्रात कौशल येत्या काही दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे.