स्टीव्ह स्मिथने घरच्या मैदानावर आपल्या शानदार शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि ब्रॅड हेडिनसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३२६ धावा उभारल्या. त्यानंतर मायकेल कार्बेरीला भोपळाही फोडता तंबूची वाट दाखवून पाहुण्यांची १ बाद ८ अशी अवस्था केली. त्यामुळे सिडनी येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर नियंत्रण मिळवले आहे.
इंग्लिश संघनायक अॅलिस्टर कुकने अॅशेस मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकताना ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला पाचारण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ फक्त ९७ धावांत तंबूत परतला. परंतु दिवसअखेर मात्र ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड घट्ट होती. खेळ थांबला तेव्हा कुक ७ आणि ‘नाइट वॉचमन’ जिम्मी अँडरसन १ धावांवर खेळत होते.
स्मिथ आणि हॅडिन यांनी सहाव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. हेडिनने मालिकेत सहाव्यांदा ५०हून अधिक धावा केल्या असून, ६६.४२च्या सरासरीने ४६५ धावा केल्या आहेत. २४७ मिनिटे आणि १५४ चेंडू खेळपट्टीवर तग धरणाऱ्या स्मिथने १७ चौकार आणि एका षटकारासह ११५ धावा केल्या आणि तो सर्वात शेवटी बाद झाला. नव्वदीच्या टप्प्यानंतर स्मिथने शतकासाठी फार वेळ घेतला नाही. पदार्पणवीर लेग-स्पिनर स्कॉट बोर्थविकला षटकार आणि चौकार ठोकून इंग्लंडविरुद्ध तिसरे आणि सिडनी क्रिकेट मैदानावरील पहिले शतक झळकावले. स्मिथ ९९ धावांवर असताना बोर्थविकच्या फुलटॉस चेंडूवर स्मिथने मिड-विकेटला चौकार मारला. वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सने ९९ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली. स्टोक्सने एकाच षटकात रयान हॅरिस, पीटर सिडल आणि स्मिथ यांचे बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावापुढे पूर्णविराम दिला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७६ षटकांत सर्व बाद ३२६ (शेन वॉटसन ४३, स्टीव्ह स्मिथ ११५, ब्रॅड हॅडिन ७५; स्टुअर्ट ब्रॉड २/६५, बेन स्टोक्स ६/९९)
इंग्लंड (पहिला डाव) : ६ षटकांत १ बाद ८.
बॉइड रँकिनच्या कसोटी पदार्पणावर दुखापतीचे सावट
सिडनी : इंग्लंडच्या बॉइड रँकिनचे कसोटी पदार्पण पहिल्याच दिवशी अतिशय झगडणारे ठरले. कारण मांडीच्या दुखापतीमुळे त्याला दोनदा मैदानाबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे वेगवान गोलंदाज रँकिनला दिवसभरात फक्त ८.२ षटकेच टाकता आली. मेलबर्न कसोटीनंतर इंग्लंडने अखेरच्या कसोटीसाठी संघात तीन बदल केले. यात टिम ब्रेसननऐवजी रँकिनला संधी मिळाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियाचे ‘स्मिथ’!
स्टीव्ह स्मिथने घरच्या मैदानावर आपल्या शानदार शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि ब्रॅड हेडिनसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

First published on: 04-01-2014 at 04:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ashes ton up smith rescues australia after stokes heroics with ball