मैदानावर आक्रमक पवित्रा धारण करत प्रतिस्पध्र्याची दाणादाण उडवणाऱ्या विराट कोहलीच्या कप्तानीखाली पहिल्या मोठय़ा कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहेत. गेल्या २२ वर्षांमध्ये भारताला श्रीलंकेच्या धर्तीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध भारतीय युवा संघ जेव्हा उतरेल तेव्हा त्यांच्यापुढे विराट राज्य स्थापन करण्याचेच लक्ष्य असेल.
सिडनीमध्ये महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. त्या दौऱ्यानंतर बांगलादेशमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एक कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे कोहलीसाठी ही पहिली मोठी कसोटी मालिका असणार आहे. कोहली सध्या धावांचा दुष्काळ अनुभवत असून संघाचे नेतृत्व करताना तो किती धावा करतो, यावर साऱ्यांची नजर असेल. दुखापतीमुळे मुरली विजय पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकत नसल्याने शिखर धवनबरोबर युवा लोकेश राहुल सलामीला येणार आहे. तर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि कर्णधार कोहली यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.
युवा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या फलंदाजीबाबतही उत्सुकता असेल. भारताने यापूर्वीच पाच गोलंदाजांनिशी खेळण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वरुण आरोन, उमेश यादव आणि इशांत शर्मा या वेगवान त्रिकुटाला पहिल्या सामन्यात संधी मिळेल. फिरकीपटू हरभजन सिंगचे संघात पुनारागमन झाले असून गाठीशी असलेल्या अनुभवामुळे त्याला संघात स्थान देण्यात येईल. पण त्याला ‘ऑफ स्पिनर’ आर. अश्विन साथ देणार की ‘लेग स्पिनर’ अमित मिश्रा हा तिढा कोहलीला सोडवावा लागणार आहे. पण पहिल्या सामन्यात मिश्रापेक्षा अश्विनलाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेला बरेच काही शिकायला मिळाले असेल. श्रीलंकेच्या संघातही युवा खेळाडूंचा भरणा आहे. कुमार संगकाराची ही अखेरची कसोटी मालिका असल्याने त्याला विजयाची भेट देण्यासाठी संघ आतुर असेल. दांडगा अनुभव गाठीशी असलेला संगकारा हा संघासाठी फलंदाजीचा कणा असेल. शमिंडा एरंगा, सुरंगा लकमल यांना या मालिकेला मुकावे लागणार आहे, तर दुशमंथा चमिरा अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, के.एल. राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर. अश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि वरुण आरोन.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लहिरु थिरीमाने, कुशल सिल्व्हा, चिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चंडिमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कुशल परेरा, रंगना हेराथ, लिरुवान परेरा, थरिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नाडो, दुशमंथा, चमिरा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर.
सामन्याची वेळ : सकाळी १०.०० वा. पासून.

गेली १५ वर्षे देशाची अविरत सेवा करणाऱ्या कुमार संगकाराची ही अखेरची मालिका असेल. त्यामुळे त्याला विजयाने कारकीर्दीचा शेवट करावा, ही इच्छा आमच्या मनात असून हा मालिका विजय आम्ही त्यालाच समर्पित करणार आहोत. संगकाराने सातत्याने नेत्रदीपक कामगिरी केली असून तो आमच्यासाठी आदर्शवत आहे. संघांमध्ये युवा, गुणवान खेळाडूंचा भरणार असून ही मालिका रंगतदार होईल, अशी आशा आहे.
-अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार

माझ्यासाठी कर्णधार म्हणून ही पहिली मालिका असून चांगली संधी आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत मी उत्सुक आहे. यापूर्वी झालेल्या चुकांवर आम्ही विचार करून त्यावर मात करण्याची रणनीती आखली आहे. संघामध्ये एकजूट असून युवा खेळाडू दामदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.
-विराट कोहली, भारताचा कर्णधार.