Puneri Paltan Pro Kabaddi Player Pankaj Mohite: मेहनत आणि जिद्द असेल, तर नशिब बदलायला वेळ लागत नाही. कबड्डीने अनेक खेळाडूंना मोठं केलंय. त्यापैकीच एक नाव म्हणजे मुंबईतील वडाळा येथील गणेश नगर येथेील १० बाय १० च्या घरात राहणारा पंकज मोहिते. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा पंकज मोहिते आता प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटनसाठी ट्रंपकार्ड ठरतोय. पुणेरी पलटनचा संघ आता दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या उंबरठ्यावर आहे. यात पंकज मोहितेचा मोलाचा वाटा राहिला आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. अनेक अडचणींना मागे टाकून आता वडाळ्याचा वंडर बॉय आता प्रो कबड्डीचा पोस्टर बॉय बनला आहे.
पंकज नववीला होता, त्यावेळी २०१२ मध्ये त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण आई खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती. चार मुली आणि एका मुलाची संपूर्ण जबाबदारी आता आईवर होती. आईला त्यावेळी ७ हजार रूपये पगार होता. यात घर चालवणं आणि शिक्षणाचा खर्च भागवणं कठीण जात होतं. मोठ्या बहिणीने आपलं शिक्षण पूर्ण करत असताना शिकवणी घ्यायला सुरूवात केली. पंकजला शिक्षणात फार काही रस नव्हता. तो स्थानिक स्तरावर आणि व्यावसायिक कबड्डी खेळून जे मानधन मिळायचं, तो पैसा तो आपल्या कबड्डीला लागणारा खर्च भागवण्यासाठी वापरायचा. असं पंकज म्हणाला.
कबड्डीची सुरूवात कुठून झाली?
पंकजने शाळेत असताना कबड्डी खेळायला सुरूवात केली. त्याचं शालेय शिक्षण आयईएस दिगंबर पाटकर विद्यालयात पूर्ण झालं. शालेय स्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवल्यानंतर त्याने पुढे क्लब लेव्हललाही दमदार खेळ केला. पंकजचं बारावीपर्यंतचं शिक्षण वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय येथे झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने महर्षी दयानंद विद्यालयात प्रवेश घेतला. राजेश पाडावे सर यांनी पंकजला या महाविद्यालयात येण्यासाठी व या महाविद्यालयाच्या संघाकडून खेळण्याचे आवाहन केलं. या महाविद्यालयाकडून खेळत असताना त्याला देना बँकेकडून खेळण्याची ऑफर मिळाली. या बँकेकडून कबड्डी खेळत असताना त्याला दरमहा २५०० रूपये मानधन दिले होते. पण हे मानधन डायट आणि फिटनेसचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे तो स्थानिक स्पर्धांमध्ये इतर संघांकडून खेळू लागला. या स्पर्धा जिंकून जी बक्षिसाची रक्कम मिळायची, ती रक्कम वाटून घेतली जायची आणि तेच पैसे फिटनेस आणि डायटचा खर्च भागवण्यासाठी वापरले जायचे, असं पंकजने जिओस्टारकडून आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले .
यशाचं श्रेय कोणाला दिलं?
आपल्या आईबद्दल बोलताना पंकज म्हणाला, “मी आज जे काही आहे, ते मी माझ्या आईमुळे आणि कुटुंबामुळे आहे. माझ्या आयुष्यात अनेक चढ- उतार आले. पण माझी आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. माझ्या मोबाईलमध्ये आईचा नंबर ‘मेरी दुनिया’म्हणून सेव्ह केला आहे. त्यामुळे मी आईला नेहमीच पहिलं श्रेय देतो.”
पंकजने आपल्या यशाचं श्रेय आणखी एका व्यक्तीला दिलं ते म्हणजे, प्रशिक्षक अशोक शिंदे सर. पंकजच्या व्यावसायिक कबड्डीची सुरूवात देना बँकेकडून खेळताना झाली. याच संघाकडून खेळत असताना अशोक सरांची नजर पकंज मोहितेवर पडली. त्यावेळी त्यांनी पंकजला एअर इंडियाकडून खेळण्याची ऑफर दिली. या संघाकडून पंकजसह अस्लम इनामदार, सुशांत सईल देखील खेळत होता. या खेळाडूंनी एअर इंडिया संघाला ५ जेतेपदं मिळवून दिली. अशोक सरांनी त्याला पुढे खेळण्याची संधी दिली. त्यामुळे सर्व श्रेय अशोक सरांना देतो, असंही पंकजने सांगितलं.
प्रो कबड्डीमध्ये एंट्री कशी झाली?
पंकजने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात बंगळुरू संघासाठी ट्रायल्स दिले होते. त्यावेळी तो एअर इंडियाकडून खेळायचा. या ट्रायल्समध्ये तो सिलेक्टही झाला होता. पण कॅम्प सुरू होण्याच्या एक दिवसाआधी त्याला बंगळुरू बुल्स संघाच्या मॅनेजरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, आम्ही २ खेळाडूंची निवड केली आहे. तुम्ही नाही आलात तरी चालेल. ही गोष्ट पंकजच्या मनाला लागली. पण तो खचून गेला नाही, त्याने आणखी मेहनत घेतली. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात अशोक सरांनी संधी दिली आणि मी त्या संधीचं सोनं केलं, असं पंकजने सांगितलं.