ब्युनोस आयर्स : यंदा कतार येथे होणारा ‘फिफा’ विश्वचषक आपल्या कारकीर्दीतील अखेरचा असेल, असे अर्जेटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसी म्हणाला. ३५ वर्षीय मेसीला यंदा पाचव्यांदा विश्वचषकात खेळण्याची संधी लाभणार आहे. परंतु त्याला विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. अर्जेटिनाचा संघ गेल्या ३५ सामन्यांत अपराजित असून गेल्या वर्षी मेसीच्या नेतृत्वात या संघाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे विश्वचषकाच्या जेतेपदासाठी अर्जेटिनाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

‘‘माझ्या कारकीर्दीतील ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल. विश्वचषक सुरू होण्याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे. अखेरचा विश्वचषक असल्याने एकीकडे मला थोडे दडपण जाणवत आहे. दुसरीकडे, मी कतारमध्ये दाखल होण्यासाठी आणि विश्वचषकात दर्जेदार कामगिरी करण्यासाठी खूप उत्सुक आहे,’’ असे मेसी म्हणाला.