Asia Cup 2025 Final Pakistan Player Sledge Tilak Varma Video: तिलक वर्माने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरूद्ध मॅचविनिंग खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. पाकिस्तानी गोलंदाजांवर तिलक वर्मा एकटाच भारी पडला. तिलक वर्माचा मैदानावरील शांत स्वभाव आणि प्रसंगावधानता पाहून केलेल्या खेळीने त्याने सर्वांची मनं जिंकली. पण तिलक वर्मा फलंदाजी करत असताना पाकिस्तानचा यष्टीरक्षक त्याला स्लेज करताना दिसला. पण तिलक वर्माने असं उत्तर दिलंय की पाकिस्तानचा संघ जन्मभर लक्षात ठेवेल.

भारतीय संघ १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात फार खराब झाली. पण नंतर २२ वर्षीय तिलक वर्माने एकट्याने आपल्या खांद्यावर संघाची जबाबदारी घेतली. तिलकने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला विजय मिळवून देत माघारी परतला. तिलकने प्रचंड तणावाच्या स्थितीत फलंदाजी केली, पण त्याची समज, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि शांत स्वभाव यांनी पाकिस्तानसमोर मोठं आव्हान उभं केलं.

तिलक वर्माला स्लेज करणं पाकिस्तानच्या खेळाडूंना पडलं महागात

तिलक वर्मा अत्यंत तणावाच्या वातावरणात मैदानावर फलंदाजी करत होता. भारतासाठी प्रत्येक चेंडू, धाव महत्त्वाची होती. यादरम्यान पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद हारिस तिलकला स्लेज करत होता. सहाव्या षटकात फहीम अश्रफच्या षटकात तिलक वर्मा फलंदाजी करता होता. भारताची अवस्था त्या क्षणी ३ बाद २० धावा होती आणि टीम इंडियाला विकेट गमावणं या क्षणी महागात पडलं असतं. पण तिलक आणि संजूने शानदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.

मोहम्मद हारिस विकेटच्या मागून तिलक वर्माला आयपीएल आणि मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत चिडवताना दिसला. हारिस म्हणत होता. ही काय मुंबई नाहीये आणि आयपीएलची मॅचही सुरू नाहीये. पण तिलक वर्माने हारिसच्या या स्लेजला करण्याला बिलकुल वळून उत्तरही दिलं नाही. पण त्याने बॅटने जे उत्तर दिलं आहे ते पाकिस्तान जन्मोजन्म विसरू शकणार नाहीये.

तिलक वर्माने हारिस रौफच्या अखेरच्या षटकात षटकार लगावत भारताचा विजय निश्चित केला, यानंतर रिंकूने पुढच्या चेंडूवर चौकार लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताला विजय मिळताच तिलक वर्मा संपूर्ण मैदानात धावताना दिसला. त्यानंतर त्याने जर्सीवरील भारताचं नाव दाखवत सॅल्युट केलं आणि विजयाचा आनंद साजरा केला.