दुबई : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडू मला बरेच काही बोलत होते, पण मी त्यांना केवळ फलंदाजीनेच उत्तर देण्याचे ठरवले, असे तिलक वर्मा म्हणाला.

पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची २ बाद १० अशी स्थिती असताना तिलक खेळपट्टीवर आला. त्याने संयम राखून अखेरपर्यंत फलंदाजी करताना ५३ चेंडूंत नाबाद ६९ धावा केल्या आणि भारताला विजयही मिळवून दिला.

‘‘मी खेळायला आलो, तेव्हा पाकिस्तानी खेळाडू मला बरेच काही बोलत होते. मात्र मी शांत राहिलो. मला माझ्या फलंदाजीतून त्यांना उत्तर द्यायचे होते. कारकीर्दीत सर्वोत्तम खेळी करण्यासाठी मला त्यांच्या बोलण्यानेच प्रेरित केले,’’ असे तिलकने सांगितले. संजू सॅमसनबरोबरच्या उपयुक्त भागीदारीनंतर तिलक आणि शिवम दुबे यांच्यात झालेली ६० धावांची भागीदारी निर्णायक ठरली.

‘‘माझ्या फलंदाजीनेच त्यांना उत्तर दिल्याचे समाधान आहे. प्रेक्षकांतून होणाऱ्या वंदे मातरमच्या जयघोषाने अंगावर शहारा येत होता. तेव्हाच मला फक्त ‘भारत माता की जय’ म्हणायचे होते हा निश्चय करून फलंदाजी केली,’’ असे तिलक म्हणाला.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताने नवा चेंडू आश्चर्यकारकरीत्या शिवम दुबेच्या हाती सोपविला. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘‘मी गोलंदाजीवर खूप मेहनत घेत आहे. भारतीय समर्थकांच्या प्रार्थनाही माझ्या मागे होत्या. व्यवस्थापनाने भरपूर पाठिंबा दिला आणि विश्वास दाखवला. महत्त्वाच्या सामन्यात मला एक मोठी संधी मिळाली याचा खूप आनंद झाला,’’ असे दुबेने सांगितले.