वृत्तसंस्था, पॅरिस जेतेपदासाठी प्रबळ दावेदार कार्लोस अल्कराझ आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच सहाव्या मानांकित होल्गर रुननेही विजयी घोडदौड कायम राखली. महिलांमध्ये अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकने चीनच्या शिनयू वान्गचा धुव्वा उडवला. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत स्पेनच्या अग्रमानांकित अल्कराझने २६व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हचा ६-१, ६-४, ६-२ असा पराभव केला. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझ १-४ असा पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर सलग पाच गेम जिंकत त्याने सेट आपल्या नावे केला. मग तिसऱ्या सेटमध्ये हीच लय राखत स्पर्धेत आगेकूच केली. अन्य लढतीत पाचव्या मानांकित त्सित्सिपासने अर्जेटिनाच्या दिएगो श्वाट्झमनला ६-२, ६-२, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवले.रुनने अर्जेटिनाच्याच जिनारो ऑलिव्हिएरीचा ६-४, ६-१, ६-३ असा पराभव केला.महिला एकेरीत पोलंडच्या श्वीऑनटेकने वान्गला ६-०, ६-० असे सहज निष्प्रभ केले. अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने मिरा अॅड्रीव्हावर ६-७ (५-७), ६-१, ६-१ अशी मात करताना आगेकूच केली. रायबाकिनाची माघार विम्बल्डन स्पर्धेतील गतविजेत्या एलिना रायबाकिनाने आजारपणामुळे शनिवारी फ्रेंच खुल्या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ‘‘मला सर्वोत्तम खेळ करायचा होता. मात्र, मला ते शक्य नाही. मला श्वास घेतानाही त्रास होतो आहे. त्यामुळे मला धावणेही अशक्य झाले आहे. मी सध्या सामने खेळण्याच्या स्थितीत नाही,’’ असे रायबाकिना म्हणाली. नदालवर शस्त्रक्रिया स्पेनचा २२ ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू राफेल नदालवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला आणखी पाच महिने टेनिसपासून दूर राहावे लागणार असल्याचे नदालचे प्रवक्ते बेनिटो पेरेझ-बार्बाडिलो यांनी सांगितले. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे नदालला यंदाच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेला मुकावे लागले.