भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कोम हिचं यंदाच्या Tokyo Olympic 2020 मधलं पदकाचं स्वप्न भंगलं खरं. पण यामुळे मेरी कोम अजिबात निराश झालेली नाही. मेरी कोमचं वय आणि ऑलिम्पिकमध्ये आलेलं अपयश या पार्श्वभूमीवर मेरी कोमच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, मेरी कोमनं या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. “माझ्याकडे अजूनही वेळ आहे, मी वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत खेळू शकते”, असं मेरी कोम म्हणाली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कोलंबियाच्या वेलॅन्सियाकडून ३-२ अशा फरकानू पराभूत झाल्यानंतर मेरी कोमचं ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलं. सामन्यानंतर तिने भारतीय बॉक्सरविरोधात हेतुपुरस्सर कट करण्यात आल्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप देखील केला होता.

मला देशाची माफी मागायची आहे…!

मेरी कोमनं एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मला पदक घेऊनच भारतात यायचं होतं. ते अशक्य होतं असंही काही नव्हतं. मला कळत नाहीये यावर काय बोलावं. सामन्यात झालेली ती एक फसवणूक होती. मी पहिला आणि दुसरा राऊंड जिंकले होते. मग मी कशी काय हरू शकते? मला याबद्दल देशाची माफी मागायची आहे”, असं मेरी कोम म्हणाली आहे. यावेळी निवृत्तीविषयी विचारणा करताच तिनं ही शक्यताच फेटाळून लावली. “माझा इतक्यात निवृत्त होण्याचा अजिबात विचार नसून मी वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत खेळू शकते”, असं उत्तर ३८ वर्षीय मेरी कोमनं दिलं.

कडव्या झुंजीनंतर मेरीचा स्वप्नभंग

मेरी कोमनं केला कटाचा आरोप!

भारतासाठी आजपर्यंत ६ वेळा विश्वविजय साकार करणारी बॉक्सर मेरी कोमला टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५१ किलो वजनी गटामध्ये कोलंबियाच्या तृतीय मानांकित इंग्रिट वेलेन्सियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तिच्या पदक मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या. दरम्यान, हा माझ्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप मेरी कोमनं केला आहे.

‘‘लढतीच्या पाच मिनिटे आधी मला गणवेश बदलायला सांगितल्यामुळे माझे मानसिक संतुलन ढळले. कारण त्याच वेळी माझे नाव पुकारले जात होते,’’ असे मेरीने सांगितले. ‘‘भारताच्या जर्सीत मी आत्मविश्वासाने आधीची लढत खेळले होते. माझी मानसिक संतुलन बिघडावे, यासाठीच हा कट आखला होता,’’ असा आरोप मेरीनं केला आहे.