टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला ५-४ ने पराभूत केलं. या विजयानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक पटकावलं आणि संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मनप्रीत खूप खूप शुभेच्छा. तू आणि तुझ्या संघांनं जे काही केलं आहे, त्यामुळे संपूर्ण देश आज आनंदाने नाचत आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत केली. माझ्याकडून संपूर्ण संघाला शुभेच्छा. आज संपूर्ण देशाला तुमचा गर्व वाटत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनप्रीतला सांगितलं. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक ग्राहम रीड याच्याशी संवाद साधला.

मनप्रीत सिंह– नमस्कार सर

पंतप्रधान मोदी– मनप्रीत जी, खूप खूप शुभेच्छा, संपूर्ण संघाने मोठी कामगिरी केली आहे.

मनप्रीत सिंह– धन्यवाद सर

पंतप्रधान मोदी– संपूर्ण देश नाचत आहे.

मनप्रीत सिंह– धन्यवाद सर, आपण दिलेले आशीर्वाद आमच्यासोबत आहेत.

पंतप्रधान मोदी– त्या दिवशी आवाज कमी होता. आज आवाजात दम दिसतोय.

मनप्रीत सिंह– सर, तुम्ही दिलेली प्रेरणा संघाला कामी आली.

पंतप्रधान मोदी– नाही, नाही. आपण केलेल्या मेहनतीचं फळ आहे. पीयूषजीने सुद्धा आपल्यासोबत खूप मेहनत केली. माझ्याकडून खेळाडूंना शुभेच्छा दे. आपण १५ ऑगस्टला भेटतोय, मी तुम्हा सर्वांना तिथे बोलवलं आहे.

मनप्रीत सिंह– धन्यवाद सर

यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण संघाला ट्वीट करून शुभेच्छा दिल्या होत्या. “ऐतिहासिक! हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात राहील. कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा. भारताला आपल्या हॉकी संघावर गर्व आहे”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

१९४८ ते १९६० ऑलिम्पिक स्पर्धा

स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. स्वातंत्र्यानंतर भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावलं. कुस्तीपटू खाशबा दादासाहेब जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावं लागलं. भारताने १९६४ टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केलं. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळालं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympic hockey team winning bronze medal pm modi called and talk with captain rmt
First published on: 05-08-2021 at 14:01 IST