करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धादेखील पुढे ढकलण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ही स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ या वर्षात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य डिक पौंड यांनी दिली.
CoronaVirus : टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर? दुहेरी दणक्यानंतर जपान नरमलं…
ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानंतर इंग्लंडच्या सरकारनेदेखील त्यांचे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे ऑलिम्पिक समितीला हा निर्णय घ्यावा लागला. विविध देशांकडून मिळालेल्या माहितींच्या आधारे ऑलिम्पिक समिती या निर्णयापर्यंत पोहोचली आहे. २०२१ मध्ये स्पर्धा नक्की कधी सुरू होईल याबाबत ठोस माहिती आता देणं कठीण आहे पण २४ जुलै २०२० पासून ऑलिम्पिक स्पर्धा नक्की सुरू होणार नाहीत, याची मी खात्री देतो, असे पौंड यांनी सांगितले.
CoronaVirus : “जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळणार ना…”
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. करोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. पण स्पर्धा नियोजित वेळीच होणार असा पवित्रा जपानचे सरकार आणि ऑलिम्पिक समिती यांच्याकडून घेण्यात आला. त्यानंतर आधी कॅनडा, नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे या तिहेरी दणक्यानंतर जपानचे सरकार नरमलं असून ऑलिम्पिकचे आयोजन लांबणीवर टाकण्यातच येणार आहे. सध्याची स्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे हे अनिवार्य असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी कालच म्हटले होते.