आपल्या प्रशिक्षकांनीच बांबूच्या सहाय्याने मारहाण केल्याची तक्रार जपानच्या महिला ऑलिम्पिकपटूंनी जपानच्या ऑलिम्पिक समितीकडे केली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसह पंधरा खेळाडूंनी प्रशिक्षक रियुजी सोनोदा यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, प्रशिक्षकांनी आम्हास शारीरिक शिक्षा सांगितल्यानंतर आम्ही त्यास आक्षेप घेतला. त्यामुळे रागाने या प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या श्रीमुखात भडकावल्या. तसेच जपानी मार्शल आर्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बांबूंच्या दांडक्याने खूप मारहाण केली. आमच्यापैकी काही खेळाडूंना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. तरीही त्या अवस्थेत आम्हास स्पर्धेत भाग घेण्याची सक्ती करण्यात आली.
खेळाडूंच्या तक्रारींची दखल घेत जपान ऑलिम्पिक समितीने अखिल जपान ज्युदो महासंघास या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. जपानच्या ज्युदो महासंघाचे प्रमुख कोशी ओनोजावा यांनी सोनोदा व अन्य प्रशिक्षकांची चौकशी करण्यासाठी समितीही नेमली आहे.