आज भारतासमोर दुसऱ्या लढतीत विंडीजचे आव्हान
पीटीआय, केप टाऊन : सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय महिला संघासमोर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात बुधवारी वेस्ट इंडिजचे आव्हान असणार आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.
उपकर्णधार स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीतही भारताने पाकिस्तानविरुद्ध विक्रमी विजयाची नोंद केली. या सामन्यात भारताने १५० धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार केले. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे; परंतु भारताच्या गोलंदाज कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतील.
पाकिस्तानच्या डावातील दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना चांगला मारा करता आला नव्हता. पाकिस्तानची १० षटकांत ३ बाद ५८ अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने २० षटकांत १४९ धावांची मजल मारली. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या लढतीत भारतीय गोलंदाजांना आपल्या चुका सुधाराव्या लागतील. पूजा वस्त्राकर व रेणुका सिंह ठाकूर या मध्यमगती गोलंदाजांकडून संघाला अपेक्षा असतील. तसेच फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड यांच्यासमोर विंडीज संघाच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.
भारताला स्पर्धेचे जेतेपद मिळवायचे झाल्यास फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखावे लागेल. पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना १८व्या षटकात रिचा घोषने लगावलेल्या तीन चौकारांमुळे भारताला विजय मिळवता आला. सलामीवीर शफाली वर्माला पाकिस्तानविरुद्ध चमक दाखवता आली नाही. त्यामुळे विंडीजविरुद्ध तिच्याकडून अधिक चांगल्या अपेक्षा असतील. यास्तिका भाटियाला प्रभाव पाडता आला नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरही लवकर बाद झाली; परंतु मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (३८ चेंडूंत नाबाद ५३) निर्णायक अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला.
दुसरीकडे, पहिल्या लढतीत इंग्लंडविरुद्ध केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर विंडीजचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाला गेल्या सलग १४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे विंडीजने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत सुधारणा करणे गरजेचे आहे.
मानधना दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध?
भारताची सलामीवीर स्मृती मानधनाला दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या सामन्याला मुकावे लागले होते. मात्र, विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ती खेळण्याची शक्यता आहे. मानधनाच्या पुनरागमनामुळे भारताच्या फलंदाजीच्या फळीला अधिक बळकटी मिळेल.
- वेळ : सायं. ६.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी