दक्षिण आफ्रिकेतील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अखेरीस भंगलेलं आहे. अंतिम फेरीत बांगलादेशने भारतावर ३ गडी राखत मात करत पहिल्यांदाच १९ वर्षाखालील विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. भारताने विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं आव्हान बांगलादेशने संयमी खेळी करत पूर्ण केलं. भारताकडून रवी बिश्नोई आणि सुशांत मिश्राने गोलंदाजीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र इतर भारतीय गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे भारताने मोक्याच्या क्षणी सामना गमावला.
भारतीय गोलंदाजांचा हाच स्वैर मारा संघाच्या पराभवाला एका अर्थाने कारणीभूत ठरला आहे. अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा करत केवळ बांगलादेशला १७८ धावांचं लक्ष्य दिलं. विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला कमी आव्हान असताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करणं गरजेचं होतं. मात्र अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी थोड्या-थोडक्या नव्हे तर चक्क ३३ अवांतर धावा दिल्या. ज्यात १९ वाईड बॉल होते. गोलंदाजांच्या या सुमार कामगिरीमुळे बांगलादेशच्या संघावर विकेट जाऊनही दडपण पहायला मिळालं नाही.
सामना जिंकायला १५ धावा हव्या असताना सामन्यात पावसाने हजेरी लावली. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला विजयासाठी १७८ धावांचं आव्हान कमी करुन १७० धावांचं करुन देण्यात आलं. ज्याचा फायदा घेत अकबर अली आणि रकीब उल-हसन जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
