महाराष्ट्रातील संघांमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील लढाईत यू मुंबाने पुणेरी पलटणचा २८-२१ असा पराभव करून घरच्या मैदानावर विजयी चौकार ठोकला. रिशांक देवाडिगा आणि शब्बीर बापू यांच्या चढायांना मोहित चिल्लरच्या पकडींची सुरेख साथ लाभल्यामुळे यू मुंबाला हा विजय साकारून गुणतालिकेत अव्वल स्थान राखता आले. मागील हंगामात तळाच्या स्थानावर राहणाऱ्या पुणेरी पलटणची पहिल्या टप्प्यातील दोन सामन्यांनंतरही पाटी कोरी राहिली.
वरळीच्या सरदार वल्लभभाई स्टेडियमवर चालू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या दिवशी यू मुंबाला मध्यंतरापर्यंत पुण्याने तोलामोलाची टक्कर दिली. पहिल्या सत्रात यू मुंबाकडून रिशांक आणि शब्बीरने आक्रमण केले, तर पुण्याकडून वझीर सिंगने दमदार चढायांनी गुण मिळवले. सहाव्या मिनिटाला पुणेरी पलटणचा भरवशाचा चढाईपटू योगेश हुडाला दुखापत झाल्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. याचा फटका पुण्याला बसला. दुसऱ्या सत्राच्या २९व्या मिनिटाला पुणेरी पलटणने यू मुंबावर लोण चढवून आपल्याकडे १८-१७ अशी आघाडी घेतली होती. परंतु ती त्यांना टिकवता आली नाही. अखेर ३९व्या मिनिटाला यू मुंबाने पुण्यावर लोणची परतफेड केली आणि ७ गुणांनी विजयावर मोहर उमटवली. यू मुंबाच्या शब्बीरने चढायांचे ८ तर रिशांकने चढायांचे ७ आणि पकडीचा एक गुण मिळवला. मोहितने पाच अप्रतिम पकडी केल्या. पुण्याकडून वझीरने चढायांचे ७ गुण कमवले.
‘‘यू मुंबाची बचाव फळी सक्षम आहे, तीन चढाईपटूंचे बळ आहे. त्यामुळे हा संघ वरचढ ठरला. योगेश हुडाला झालेल्या दुखापतीमुळे संघात दुसऱ्या चढाईपटूची उणीव तीव्रतेने भासली. त्यामुळे माझ्या चढायांवरच अधिक भार पडला. सामना आम्ही जिंकू शकलो असतो. मात्र तो निसटल्याचे शल्य नक्की जाणवत आहे,’’ अशी प्रतिक्रिया पुणेरी पलटणचा कर्णधार वझीर सिंगने सामन्यानंतर व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगाल वॉरियर्स खाते उघडणार का?
मुंबईच्या पहिल्या टप्प्यात अपयशाने सुरुवात करणाऱ्या बंगाल वॉरियर्सच्या कोलकाता भूमीत बुधवारपासून प्रो कबड्डीचा दुसरा टप्पा रंगणार आहे. बंगालचा सलामीचा सामना गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्ससोबत होणार आहे. दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने गमावल्यामुळे गुणांचे खाते उघडण्यात कोणता संघ यशस्वी ठरतो, हे पाहणे यशस्वी ठरेल. आतापर्यंतच्या दोन सामन्यांपैकी एक विजय आणि एक पराभव पत्करणाऱ्या बंगळुरू बुल्सची राकेश कुमारच्या नेतृत्वाखालील पाटणा पायरेट्सविरुद्ध लढत रंगणार आहे. सलामीच्या सामन्यात राकेशला एकही गुण मिळवता आला नव्हता. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे कबड्डीरसिकांचे लक्ष असेल.

आजचे सामने
बंगाल वॉरियर्स वि. जयपूर पिंक पंथर्स
बंगळुरू बुल्स वि. पाटणा पायरेट्स
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U mumba beat pune paltan to score fourth win in a row
First published on: 22-07-2015 at 02:13 IST