गेली १३ वर्षे मी बास्केटबॉल खेळत आहे. या खेळाने मला भरभरून दिले आहे. यूबीए लीगमधून मुंबई चॅलेंजर्स संघाकडून खेळताना या वर्षी आम्ही जेतेपद पटकावले. पण माझ्या मते हा विजय फक्त मुंबई या एका संघाचा नसून बास्केटबॉल या खेळाचा विजय आहे, असे दुसऱ्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करीत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या इंदरबीरने सांगितले.

पहिल्या अंतिम फेरीत इंदरबीरला जास्त संधी देण्यात आली नव्हती. पण कमी वेळात त्याने चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या अंतिम फेरीत मात्र इंदरबीरला सुरुवातीपासून संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने केले. दुसऱ्या अंतिम फेरीत इंदरबीरने मुंबईकडून खेळताना सर्वाधिक ३३ गुणांची कमाई केली.

‘हा विजय नक्कीच सहजासहजी मिळालेला नाही. यासाठी अथक परिश्रम केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही जी रणनीती आखली होती ती आम्हाला प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले. दुसऱ्या अंतिम फेरीत बंगळूरुचा संघ जोरदार आक्रमण करणार, हे आम्हाला माहिती होते. त्यासाठी आम्ही सुरुवातीला बचाव करण्यावर भर दिला. प्रत्येक सत्राच्या काही मिनिटांमध्ये आम्ही नियोजनबद्ध आक्रमण केले आणि त्याचाच फायदा आम्हाला झाला.

पहिल्या अंतिम फेरीत अ‍ॅलेक्स स्केल्स आणि जिमी स्क्रोगिन्स या दोन्ही परदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या अंतिम सामन्यात बंगळूरुने या दोन्ही खेळाडूंवर करडी नजर ठेवली होती. त्या वेळी मुंबईच्या संघाने इंदरबीरसारख्या खेळाडूला संधी दिली.

अ‍ॅलेक्स आणि जिमी या खेळाबद्दल इंदरबीर म्हणाला की, ‘या दोन्ही खेळाडूंकडे खेळाचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर ते हा अनुभव अन्य खेळाडूंना सांगतात. त्यामुळे संघातील युवा खेळाडूंना त्यांच्या अनुभवातून कमी कालावधीत भरपूर काही शिकता आले आहे. मीदेखील अमेरिकेत ‘एनबीए’मध्ये जाऊन आलो आहे. तिथे खेळाच्या तंत्राबद्दल मोलाची माहिती मला मिळाली. त्याचबरोबर खेळताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ कसे ठेवायला हवे, याचेही धडे मिळाले.’

 यूबीए लीग हे चांगले व्यासपीठ

बास्केटबॉल हा खेळ अमेरिकेत फार प्रसिद्ध आहे. भारतामध्ये या खेळाला चालना मिळायला सुरुवात झाली आहे. यामध्ये यूबीए प्रो लीगचाही वाटा आहे. कारण ही लीग खेळाडूंसाठी चांगले व्यासपीठ ठरली आहे. कारण या लीगमुळे खेळाडूंचा दर्जा उंचावायला मदत झाली आहे. या लीगला चांगला पाठिंबा मिळाला तर नक्कीच भारतामध्ये बास्केटबॉलचा चांगला प्रसार होऊ शकेल, असे इंदरबीरने सांगितले.