नुकत्याच आटोपलेल्या भारत दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या उमर अकमलवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज उमर अकमलला या दौऱ्यात चमकदार कामगिरी करत संघातले आपले स्थान पक्के करण्याची संधी होती. मात्र त्याला क्षमतेनुसार खेळ करता आला नाही.
जबाबदारीने कसे खेळायचे हे उमर कधी शिकणार? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आता रुळला आहे. आता त्याने आपल्या खेळाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे उद्गार पाकिस्तानचा महान गोलंदाज वासिम अक्रमने काढले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना उमर अकमल मोक्याच्या क्षणी बाद झाला.
निवड समितीने उमरला वगळण्याची आवश्यकता आहे. उमर स्वत:ची भूमिका समजून घेऊन मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत त्याला संघात स्थान देऊ नये, असे परखड मत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफने व्यक्त केले. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळून आपले कौशल्य घोटीव करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला पुरेशी संधी मिळाली आहे. तो एक गुणी खेळाडू आहे पण त्याने आपल्या खेळावर काम करायला हवे, असे लतीफने पुढे सांगितले.
दरम्यान भारत दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात उमरला स्थान मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्याच्याऐवजी हॅरिस सोहेलला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.