इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली जात आहे. गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा सुरू झालेल्या या सामन्यामध्ये लखनऊचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले. सुरुवातीला त्याचा हा निर्णय योग्य वाटत होता. मात्र, बंगळुरूच्या रजत पाटीदारने राहुलच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रजतने आक्रमक खेळ करत धमाकेदार शतक साजरं केले आहे. रजत पाटीदारने अवघ्या ५४ चेंडूंचा सामना करत नाबाद ११२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १२ चौकार आणि सात षटकारांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशचा खेळाडू असलेला रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांसाठी देवदूत ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल एलिमिनेटर लढतीमध्ये लखनऊच्या गोलंदाजांची बॅटने जोरदार धुलाई केली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितले जात होते तो कर्णधार फाफ डू प्लेसिस गोल्डन डकवर बाद झाला. त्यावेळी आरसीबीची अवस्था एक बाद चार अशी होती. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. पण, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. त्यामुळे आरसीबीचा संघ संकटात आला होता. मात्र, रजत पाटीदारच्या वादळी खेळीमुळे आरसीबीने लखनऊ समोर २० षटकांमध्ये २०७ धावांचे आव्हान उभं केलं आहे.

विशेष म्हणजे रजत पाटीदारला आयपीएल लिलावामध्ये कोणीही खरेदी केले नव्हते. जखमी लवनीथ सिसोदियाच्या जागी त्याचा आरसीबीच्या समावेश करण्यात आला आहे. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एलिमिनेटर सारख्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये शतकी खेळी करून त्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे. यापूर्वी त्याने गुजरात टायटन्सच्या विरुद्ध ५२ धावा करत अर्धशतक केले होते.

त्याने पावर प्लेमधील शेवटच्या षटकात कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर २० धावा आणि नंतर रवी बिश्नोईच्या एका ओव्हरमध्ये २७ धावा फटकावल्या. त्याच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक सुरू आहे.