सध्या यूएस ओपन २०२५ स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारताच्या टेनिसपटूने इतिहास घडवला आहे. ज्युनियर गटात ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकणारा भारताचा युकी भांब्रीने त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा मायकेल व्हीनससह पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
युकी आणि व्हीनस यांनी ११ व्या मानांकित निकोला मेकटिक आणि राजीव राम यांचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव केला. यापूर्वी त्यांनी केव्हिक क्रॉविट्झ आणि टिम पुएट्झ या चौथ्या मानांकित जर्मन जोडीचा पराभव केला होता. दुखापतींमुळे टेनिस एकेरी सोडल्यानंतर ३३ वर्षीय भांब्री दुहेरीवर लक्ष केंद्रित करत आहे.
जगातील माजी ज्युनियर नंबर वन खेळाडू भांब्रीची ही सिनियर ग्रँड स्लॅममधील सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह, भांब्रीने लिएंडर पेस, महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांच्यानंतर पुरुष दुहेरीत भारताचे वर्चस्व कायम ठेवले आहे. आता भांब्री आणि व्हीनस यांचा सामना सहाव्या मानांकित ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी यांच्याशी होईल.
तत्पूर्वी, युकी भांब्री आणि मायकेल व्हीनस या जोडीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीच्या केविन क्रॉविट्झ आणि टिम पुएट्झ या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला. १४ व्या मानांकित इंडो-किवी जोडीला हा सामना जिंकण्यासाठी एक तास आणि २३ मिनिट लागली.
३३ वर्षीय युकी भांब्रीच्या कारकिर्दीवर दुखापतींचा मोठा परिणाम झाला. तो त्याच्या एकेरी कारकिर्दीत कधीही यूएस ओपनमध्ये पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. दुहेरीत, त्याने या वर्षी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अनुभवी खेळाडू नोवाक जोकोविच आणि युवा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझ यांनी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सर्बियन स्टार नोवाक जोकोविचने अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झचा ६-३, ७-५, ३-६, ६-४ असा पराभव केला. स्पेनच्या अल्काराझने जिरी लेहेकाचा ६-४, ६-२, ६-४ असा पराभव केला. आता जोकोविच आणि अल्काराझ हे उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येतील.
प्रचंड कठीण सामना होता. डोक्यात बरेच वेगवेगळे विचार येत होते, असं सामन्यानंतर भांब्रीने सांगितलं. सामना खूपच अटीतटीचा होती. प्रतिस्पर्धी हे अनेक वेळा ग्रँड स्लॅम विजेते खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्या मोठ्या अनुभवामुळे आमच्यासाठी हा सामना आणखी अवघड झाला, असं भांब्री विजयानंतर म्हणाला.