१४व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने भारताच्या U19 संघाकडून खेळताना इंग्लंडमध्ये दिमाखदार कामगिरी केली. वैभवची लोकप्रियता वाढत असल्याची एक घटना समोर आली आहे. भारताचा U19 पुरूष संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये भारताने युथ वनडे मालिकेत भारताने इंग्लंडचा पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. वैभवने या मालिकेत शतकासह भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.
दरम्यान वैभवची भेट घेण्यासाठी दोन तरुणींनी सहा तासांचा प्रवास केल्याचं स्पष्ट झालं आहे. राजस्थान रॉयल्सने पोस्ट करून वैभवच्या नव्या चाहत्यांविषयी माहिती दिली आहे. आन्या आणि रिवा या दोघीजणी वैभवला भेटण्यासाठी वूस्टर इथे पोहोचल्या. राजस्थान रॉयल्सची जर्सी परिधान केलेल्या या दोघींनी वैभवबरोबर फोटोही काढला.
राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी झालेल्या लिलावात शालेय वैभव सूर्यवंशीला १.१ कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलाला संघात घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. सुरुवातीचे काही सामने वैभवला अंतिम अकरात संधी मिळाली नाही. मात्र सातत्याने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राजस्थानने लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या लढतीत वैभवला पदार्पणाची संधी देण्याचा निर्णय घेतला. अनुभवी शार्दूल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर वैभवने खणखणीत षटकार लगावत नैपुण्याची चुणूक दाखवली. त्या सामन्यात वैभवने २० चेंडूत ३४ धावांची वेगवान खेळी केली.
आयपीएल स्पर्धेतला सगळ्यात लहान वयाचा शतकवीर होण्याचा मान वैभवने नावावर केला. वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना ३८ चेंडूत १०१ धावांची दिमाखदार खेळी केली. भारतीय युवा संघासाठी खेळताना वैभवने हाच फॉर्म कायम राखत ५२ चेंडूत शतकी खेळी साकारली. वैभवने या खेळीदरम्यान युवा क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा सर्फराझ खानचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध U19 संघाविरुद्ध खेळताना ५८ चेंडूत शतकी खेळी साकारली होती. २०२४ आशिया चषक स्पर्धेत त्याने ४४च्या सरासरीने १७६ धावा केल्या. देशांतर्गत रणधीर वर्मा स्पर्धेत वैभवने नाबाद ३३२ धावांची तडाखेबंद खेळी केली होती.