वृत्तसंस्था, चेन्नई

बंधू आर. प्रज्ञानंदच्या पावलावर पाऊल ठेवत आर. वैशालीने ग्रँडमास्टरचा किताब मिळवला आहे. वैशाली भारताची एकूण ८४वी आणि केवळ तिसरी महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरली आहे. कोनेरू हम्पी व द्रोणावल्ली हरिका या भारताच्या अन्य दोन महिला ग्रँडमास्टर आहेत.स्पेनमध्ये सुरू असलेल्या एल लोब्रेगात खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत वैशालीने तुर्कीच्या तामेर तरिक सेल्बेसचा पराभव केला. या विजयासह तिने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये एलो २५०० गुणांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या कतार मास्टर्स स्पर्धेतच तिने ग्रँडमास्टर किताबासाठीचा तिसरा निकष पूर्ण केला होता. ग्रँडमास्टरचा किताब पटकावण्यासाठी बुद्धिबळपटूने २५०० एलो गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते.

२२ वर्षीय वैशाली आणि प्रज्ञानंद ही ग्रँडमास्टर किताब मिळवलेली जागतिक बुद्धिबळातील पहिली बहीण-भावाची जोडी ठरली आहे. प्रज्ञानंदने २०१८मध्ये ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता. हे दोघेही पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेतील पुरुष आणि महिला गटामधील विजेते बुद्धिबळपटू जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देतील.वैशालीने गेल्या काही महिन्यांत खूप मेहनत घेतली आहे. ‘कॅन्डिडेट्स’साठी तयारी करत असताना ग्रँडमास्टर हा किताब मिळणे तिच्यासाठी खूप खास असेल. तिचे पालक आणि तिच्या घरी बुद्धिबळाचे जे वातावरण आहे, त्याचे कौतुक झालेच पाहिजे. वैशालीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे तिचे प्रशिक्षक आरबी रमेश आणि आरती यांचेही अभिनंदन. – विश्वनाथन आनंद, विश्वविजेता बुद्धिबळपटू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.