ICC T20 Rankings Varun Chakravarthy Asia Cup 2025: भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक २०२५ स्पर्धा खेळत आहे. भारताने गटटप्प्यातील सुरूवातीचे दोन सामने जिंकत सुपर फोरमध्ये धडक मारली आहे. भारताने पहिल्या सामन्यात युएईविरूद्ध ९ विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. या दोन्ही सामन्यात भारताच्या फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान भारताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीसाठी आनंदाची बातमी आली आहे.
आशिया चषकादरम्यान भारताच्या फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादवने आपल्या फिरकीची कमाल दाखवत दोन सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतले आहेत. तर वरूण चक्रवर्ती आणि अक्षऱ पटेल यांनी त्याला चांगली साथ दिली आहे. दरम्यान वरूण चक्रवर्तीने आशिया चषकात आतापर्यंत २ विकेट्स घेतल्या असल्या तरी त्याने गोलंदाजी मात्र किफायतशीर केली आहे.
ICC टी-२० क्रमवारीत वरूण चक्रवर्ती पहिल्यांदाच ठरला जगातील नंबर गोलंदाज
आशिया चषकाच्या दरम्यान आयसीसीने टी-२० क्रिकेटमधील गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वरूण चक्रवर्ती पहिल्यांदाच जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. वरूण चक्रवर्तीला तीन स्थानांचा फायदा झाला असून ७३३ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा जेकब डफी ७१७ गुणांसह दुसऱ्या स्थानी गेला आहे. याशिवाय भारताचा रवी बिश्नोई या यादीत ८व्या स्थानी आहे.
वरूण चक्रवर्ती हा आयसीसी T20I गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी केली होती. गेल्या वर्षभरात चक्रवर्ती भारतीय T20I संघाचा कायमस्वरूपी भाग बनला आहे. दरम्यान या ३४ वर्षीय गोलंदाजाने दमदार खेळी करत आपल्या कामगिरीची सातत्याने छाप पाडली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं.
वरूणने २०२५च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याची कमाल केली. सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये त्याने यूएई आणि पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येकी एका सामन्यात दोन बळी घेतले आहेत. भारताच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमानांविरुद्ध चक्रवर्तीने १ विकेट घेत केवळ ४ धावा खर्च केल्या. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा चमकदार कामगिरी करत ४ षटकांत २४ धावांत १ बळी घेतला आणि भारताच्या दणदणीत विजयात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतर त्याला पहिलं स्थान गाठता आलं.
आशिया चषक २०२५ मधील प्रभावी कामगिरीच्या बळावर कुलदीप यादवने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आशिया चषकातील दोन्ही सामन्यांत कुलदीप यादवने मॅचविनिंग कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याने आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत १६ स्थानांनी झेप घेतली आहे. १६ स्थानांनी झेप घेतल्यानंतर कुलदीप ६०४ रेटिंग गुणांसह २३व्या स्थानी पोहोचला आहे.