रणजी करंडक अंतिम लढतीत दिल्लीचे आव्हान

आम्ही अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याची दूरदृष्टी कधीच ठेवली नाही. प्रत्येक सामना जिंकत पुढे जायचे हेच ध्येय ठेवून मदानात उतरायचो, असे विदर्भाचा कर्णधार फैज फजलने उपांत्यपूर्व सामन्यात सांगितले होते आणि तीच रणनीती अमलात आणत विदर्भाचा संघ यंदाच्या मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या उबंरठय़ावर आहे. गेली पाच दशके आणि २६६ सामन्यांनंतर विदर्भाच्या संघाला जेतेपद पटकावण्याची ही सुवर्णसंधी मिळाली आहे. पण अंतिम फेरीत त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे ते गौतम गंभीरच्या दिल्लीच्या संघाचे. दिल्लीने आतापर्यंत सात वेळा जेतेपद पटकावले असून या त्यांचे पारडे जड समजले जात आहे. पण विदर्भाच्या संघाची आतापर्यंतची अनपेक्षित कामगिरी पाहता दिल्लीचा संघ गाफील राहीला तर त्यांची ही घोडचूक ठरेल.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कोणता संघ आपले वर्चस्व गाजवून जेतेपद पटकावतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. इतिहासात पहिल्यांदा विदर्भ अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यामुळे साहजिकच विदर्भाला इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी लाभली आहे, तर दिल्लीने आतापर्यंत सातवेळा जेतेपद आणि सात वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. २००७-०८ मध्ये दिल्लीने तब्बल सोळा वर्षांनंतर अखेरचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे दिल्लीचा संघ यावेळी जेतेपदासाठी आसूसलेला असेल.

‘अ’ गटातून खेळणाऱ्या दिल्लीचे गुण ‘ड’ गटातून खेळणाऱ्या विदर्भापेक्षा कमी असले तरी दिल्लीनेही विदर्भाप्रमाणे एकही पराभव स्वीकारलेला नाही. आतापर्यंत झालेल्या आठही सामन्यात विदर्भाने चार तर दिल्लीने तीन सामन्यात विजय नोंदवला आहे. विदर्भाचा कर्णधार फैज फजल आणि त्याचा सहकारी आर. संजय हे सलामीवीर विदर्भासाठी जमेची बाजू असतील. डावखुऱ्या फजलने आठ सामन्यांमध्ये पाच शतकासह तब्बल ८४३ अशा सर्वाधिक धावा केल्या आहेत. प्रचंड अनुभव असलेल्या विदर्भाशी करारबद्ध वसीम जाफर फार्ममध्ये परतला असून गणेश सतीशनेही आपली जबाबदारी सक्षमतेने सांभाळली आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवी फिरकीपटू अक्षय वखरे, आदित्य सरवटे, कर्ण शर्माच नव्हे तर मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानी, ललित यादव या नवोदित मध्यमगती गोलंदाजांनी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दक्षिण आफ्रिका दौरा असल्याने उमेश यादव आणि दिल्लीकडून खेळणारा इशांत शर्मा महत्त्वाच्या सामन्यात संघात नसतील. गंभीरसारखा आंतरराष्ट्रीय स्तराचा दांडगा अनुभव असलेला फलंदाज दिल्लीकडे आहे. गंभीरची कामगिरी चांगली होत असली तरी त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही. नितीश राणाने सात सामन्यात ५२६ धावा केल्या आहेत.गोलंदाजीमध्ये नवदीप सैनीकडून आशा उंचावल्या आहेत.

संघ

  • विदर्भ : फैझ फजल (कर्णधार), संजय रामास्वामी, वसीम जाफर, गणेश सतीश, अपूर्व वानखेडे, विनोद वाडकर (यष्टीरक्षक), आदित्य सरवटे, अक्षय वाखरे, सिद्धेश नेरळ, रजनीश गुर्बानी, कर्ण शर्मा, शलभ श्रीवास्तव, सिद्धेश वठ (यष्टीरक्षक), अक्षय कर्णेवार, सुनिकेत बिंगेवार, रवीकुमार ठाकूर, आदित्य ठाकरे.
  • दिल्ली : रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), गौतम गंभीर, कुणाल चंडेला, ध्रुव शोरेय, नितीश राणा, हिम्मत सिंग, मनन शर्मा, विकास मिश्रा, विकास टोकस, नवदीप सैनी, कुलवंत खेज्रोलीया, आकाश सुदान, शिवम शर्मा, उन्मुक्त चंद, मिलिंद कुमार.