आयपीएलमधील शेवटच्या साखळी सामन्यामध्ये मुंबईने कोलकत्त्यावर शानदार विजय मिळवत मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आणि कोलकत्त्याला यंदाच्या हंगामातून बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयामुळे रनरेटच्या जोरावर मुंबईने चेन्नईला मागे टाकत गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पुन्हा सूर गवसल्याचे दिसले. रोहितने अर्धशतकीय खेळी करत मुंबईचा विजय सोपा करुन दिला. अर्धशतक केल्यानंतर रोहितने अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने ही खेळी आपली मुलगी समायराला समर्पित केली. रोहितच्या या आगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आला आहे.

१३४ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. रोहितने ४८ चेंडूमध्ये ५५ धावांची नाबाद खेळी करत संघाला १७ व्या षटकातच विजय मिळवून दिला. घरच्या मैदानावर खेळताना अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रोहितने हे अर्धशतक आपल्या मुलीसाठी असल्याचे आपल्या कृतीतून दाखवले. रोहितने ५०वी धाव पूर्ण केल्यानंतर बाळाला कडेवर घेऊन थोपटतात त्याप्रमाणे बॅट खांद्यावर ठेऊन थोपटली. त्यावेळी रोहितची पत्नी ऋतिकाबरोबरच मुंबईच्या सर्व खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवत आनंद साजरा केला.

सामना संपल्यानंतरही रोहित समायराबरोबर मैदानात खेळताना दिसला. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.

दरम्यान मुंबईला गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी आणि कोलकाताच्या संघाला प्ले ऑफमधील जागा मिळवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने कोलकात्याला अवघ्या १३३ धावांवर रोखले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना मुंबईने चांगली सुरुवात करत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही सामन्यातील आपले वर्चस्व दाखवून दिले. केवळ एका गड्याच्या मोबदल्यात मुंबईने १३४ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. यामध्ये सर्वात महत्वाची खेळी केली ती कर्णधार रोहित शर्माने रोहितने ४८ चेंडूमध्ये ५५ धावांची नाबाद खेळी केली. रोहितला सुर्यकुमार यादव (२७ चेंडूत ४६ धावा) आणि आणि सलामीवीर डी कॉक (२३ चेंडूत ३० धावा) चांगली साथ दिली.

आता ७ मे रोजी प्ले ऑफ्स मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.