विजय हजारे करंडकात मुंबईने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईत खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने गुजरातचा ४१ धावांनी पराभव केला. आपल्या सलामीच्या सामन्यात मध्य प्रदेशवर मात करणाऱ्या मुंबईने गुजरातलाही पराभवाची धूळ चारली. सिद्धेश लाडचं आक्रमक शतक आणि गोलंदाजीत रोस्टन डायसचे ४ बळी या जोरावर मुंबईने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची दुसऱ्या सामन्यात फारशी चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या सामन्यात ९० धावांची खेळी करणारा जय बिस्ता गुजरातविरुद्ध फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र यानंतर मैदानात आलेल्या सिद्धेश लाडने अखिल हेरवाडकरच्या साथीने भागीदारी रचत मुंबईचा डाव सावरला. अखिल हेरवाडकर माघारी परतल्यानंतर पहिल्या सामन्यातील शतकवीर सूर्यकुमार यादवलाही फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र सिद्धेश एका बाजूने मुंबईच्या डावाची खिंड लढवत राहिला. मधल्या फळीत कर्णधार आदित्य तरेने ५१ धावांची अर्धशतकी खेळी करुन सिद्धेशला चांगली साथ दिली. या जोरावर मुंबईने ५० षटकांत ३१७ धावांचा टप्पा गाठला. सिद्धेशने सामन्यात १२९ धावांची खेळी केली. गुजरातकडून इश्वर चौधरीने ३ तर पियुष चावलाने २ बळी घेतले.

मुंबईने दिलेल्या ३१८ धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाची सुरुवातही अडखळती झाली. समित गोहेल माघारी परतल्यानंतर दुसरा सलामीवीर प्रियांक पांचाळने गुजरातची बाजू लावून धरली. मात्र प्रियांकला भार्गव मेराईचा अपवाद वगळता एकही फलंदाज चांगली साथ देऊ शकला नाही. गुजरातच्या इतर सर्व फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. याचा फायदा घेत मुंबईने गुजरातवर ४१ धावांनी मात करत सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मुंबईकडून रोस्टन डायसने गुजरातच्या ४ फलंदाजांना माघारी पाठवलं.

संक्षिप्त धावफलक : मुंबई ३१७/८. सिद्धेश लाड १२९, आदित्य तरे ५१. इश्वर चौधरी ३/४६, पियुष चावला २/६९ विरुद्ध गुजरात प्रियांक पांचाळ ८९, भार्गव मेराई ६४. रोस्टन डायस ४/६४, धवल कुलकर्णी २/२९. निकाल – मुंबई ४१ धावांची विजयी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay hajare trophy 2018 mumbai beat gujarat by 41 runs siddhesh lad slams century
First published on: 06-02-2018 at 18:06 IST