यशस्वी जैस्वाल चमकला

पावसाचा फटका बसलेल्या सामन्यात मुंबईने बडोद्यावर व्हीजेडी पद्धतीनुसार १३ धावांनी मात करीत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब-गटात पहिल्या विजयाची नोंद केली.

बडोद्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर तनुष कोटियन आणि प्रशांत सोलंकीच्या गोलंदाजीमुळे त्यांचा डाव २१० धावांत आटोपला. फक्त विष्णू सोलंकीने १०० चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह ९४ धावांची झुंजार खेळी करीत बडोद्याच्या धावसंख्येला आधार दिला. तनुष आणि प्रशांत यांनी प्रत्येकी तीन

बळी घेतले.

त्यानंतर, मुंबईकडून यशस्वी जैस्वाल (नाबाद ४१) आणि अरमान जाफर (२१) यांनी ४६ धावांची सलामी दिली. पण जाफरपाठोपाठ हार्दिक तामोरे (४) आणि सूर्यकुमार यादव (१४) यांनी निराशा केल्यामुळे मुंबईची ३ बाद ८७ अशी अवस्था झाली. मग कर्णधार शाम्स मुलानीच्या साथीने यशस्वीने पुढे डाव सावरला. परंतु ३ बाद १०० धावसंख्या झाली असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्या वेळी व्हीजेडी पद्धतीनुसार, मुंबईने २३ षटकांत ८८ धावांची लक्ष्य धावसंख्या ओलांडली होती. त्यामुळे मुंबईला विजयी घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

’  बडोदा : ४९.१ षटकांत सर्व बाद २१० (विष्णू सोलंकी ९४, अतित शेठ २४; तनुष कोटियन ३/४४, प्रशांत सोलंकी ३/६१) पराभूत वि. मुंबई २३ षटकांत ३ बाद १०० (यशस्वी जैस्वाल नाबाद ४१; कृणाल पंड्या १/२०)

’  निकाल : मुंबई १३ धावांनी विजयी (व्हीजेडी पद्धतीनुसार)

’  गुण : मुंबई ४, बडोदा ०