निलंबित कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले आणि माफी मागितली. कुस्ती महासंघाने विनेशवर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तणूक आणि अनुशासनहिनतेचा आरोप केला होता. अनधिकृत जर्सीसह महासंघाने केलेल्या सर्व आरोपांचे विनेशने खंडन करत त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. विनेशच्या वकिलांकडून महासंघाला देण्यात आलेल्या उत्तरात विनेशने म्हटलंय की, “टोक्यो ऑलिम्पिकनंतर लगेच नोटीस प्राप्त झाल्यामुळे मी अस्वस्थ झालीए. मेडल न जिंकल्याबद्दल मला पश्चाताप होतोय. मात्र, महासंघाने लावलेल्या आरोपांचे मी आदरपूर्वक खंडन करते.” विनेशने माफी मागितल्यानंतरही तिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी फेडरेशनने विनेशवर केलेल्या आरोपांना फक्त उत्तर दिले आहे. आता कुस्ती महासंघ यावर काय प्रतिक्रिया देतात त्याची आम्ही वाट पाहतोय”, असं क्रीडा लीगलचे व्यवस्थापकीय भागीदार विदुषपत सिंघानिया म्हणाले.

विनेशने म्हटलंय की, ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपान सरकारने खेळाडूंच्या प्लेबुकमध्ये नमूद केलेल्या करोनाच्या गाईडलाईन्स आणि विलगीकरणाचे नियम पाळत होती. यात तिने ‘टेस्ट, ट्रेस अँड आयसोलेट’ नियमांचा संदर्भ देत म्हटलंय की, “ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पोहोचल्यानंतर भारतातील प्रत्येक खेळाडूला ३ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करणे अनिवार्य होते. परंतु भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) परदेशात प्रशिक्षण घेऊन टोक्योत पोहोचणाऱ्यांना विलगीकरण बंधनकारक नसल्याचं सांगितलं होतं. मी हंगेरीहून २८ जुलै रोजी टोक्योत पोहोचली होती.

मला माझ्या आधी येऊन विलगीकरण पूर्ण केलेल्या भारताच्या ट्रॅक आणि फील्डच्या खेळाडूंसोबत राहणे आवश्यक होते. मात्र, सर्वांची करोना चाचणी सुरू होती, त्यामुळे सावधगिरी बाळगत मी त्यांच्यासोबत न राहता भारतीय अथलिट कॉन्टिजेंटसोबत राहिले.” असं विनेशने उत्तरात म्हटलंय.

“आधी दोनदा करोनाचा संसर्ग झाल्यामुळे आणि पोस्ट कोविड दुष्परिणामांशी लढत होते, त्यामुळे मी माझ्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले. करोना माझ्या ऑलिम्पिक स्वप्नासाठी अडथळा ठरू नये, म्हणून यासाठी तिने प्रोटोकॉलचे पालन केले. जेणेकरून मी केवळ माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करू शकेल आणि करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता राहणार नाही. विलगीकरणाच्या तीन दिवसांत तिच्या मनाला आणि शरीराला तिथल्या वातावरणाची सवय झाली होती. त्यामुळे ऑल्पिम्पिकमधील उर्वरित दिवस मी त्याच टीमसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मी हा निर्णय चांगल्या कामगिरीसाठी चांगल्या हेतूने घेतला होता. ३१ तारखेपासून मी लंच आणि डिनरसाठी सोबतच्या महिला कुस्तीपटूंसोबत जात होती,” असंही तिने सांगितलं.

पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळे निवृत्तीचा विचार बदलला -विनेश

भारतीय खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेण्यास नकार..

विनेशने भारतीय कुस्ती दलातील इतर खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेण्यास नकार दिल्याचा आरोप खोटा असल्याचं म्हणत फेटाळून लावला आहे. तिने उत्तरात म्हटलंय की, “प्रोटोकॉलमुळे मी २९ जुलैच्या दुपारच्या प्रशिक्षणासाठी इतर भारतीय पैलवानांप्रमाणेच दिलेल्या वाहनानेच गेले होते. परंतु संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या मॅटवर प्रशिक्षण दिले गेले. मी ४ आणि ५ ऑगस्ट रोजी सीमा बिसलासोबत प्रशिक्षण घेतलं.”

फिजिओथेरपिस्टबद्दल बोलताना विनेशने सांगितलं की, “मला नेमबाजी पथकातून फिजिओथेरपिस्ट देण्यात आला होता. फिजीओ फक्त जपान स्टँडर्ड टाइमनुसार सव्वानऊ वाजता उपलब्ध झाला होता. त्यामुळे मी प्रशिक्षकांना माझ्या प्रशिक्षणाच्या आधीच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली होती. त्यानंतर जेव्हा फिजिओथेरपिस्ट योग्य वेळेवर उपलब्ध झाला तेव्हा माझं शेड्यूल नेहमीप्रमाणे झालं आणि त्याचा माझ्या झोपेच्या वेळेवर परिणाम झाला नाही. फिजिओसोबतच्या सेशनसाठी मी भारतीय कुस्ती दलाच्या मुख्य प्रशिक्षकांची परवानगी घेतली. त्यानंतर,  सोबतच्या इतर भारतीय कुस्तीपटूंच्या निर्धारित प्रशिक्षण वेळेपेक्षा फक्त एक तास आधी माझी ट्रेनिंग संपायची. यादरम्यान, मी माझ्या वैयक्तिक प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतले तसेच मी मुख्य प्रशिक्षकांच्या संपर्कात होते आणि त्यांना माझ्या ट्रेनिंग शेड्यूलची माहिती दिली. नंतर ३ आणि ४ तारखेला माझी भारतीय कुस्तीपटू सीमा बिसलासोबत ट्रेनिंग झाली. त्यामुळे मी भारतीय प्रशिक्षकांकडून ट्रेनिंग घेतली नाही, हा आरोप चुकीचा आहे,” असं तिनं म्हटलंय.

“मी नेहमीच कुस्ती महासंघाचा आणि सदस्यांच्या भूमिकेचा सन्मान केलाय. मी नेहमीच एक टीम प्लेयर राहिली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही माझी वर्तणूक त्याप्रमाणेच राहिली आहे.”असं विनेश म्हणाली.

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा : विनेशला कांस्य

भारतीय जर्सी न घालणे..

“IOAने दिलेली अधिकृत भारतीय ऑलिम्पिक जर्सी न घालणं ही माझी चूक होती आणि ती मी मान्य करते. ही चूक अनावधानाने आणि चुकीच्या नियोजनामुळे झाली. मी ती जर्सी ट्रेनिंगसाठी घातली होती आणि मॅचच्या दिवशी ती धुतलेली नव्हती म्हणून घातली नाही. मी ही चूक जाणून केली नव्हती.” असं तिने म्हटलंय. विनेशला पहिल्या मॅचच्या आदल्या दिवसापासून अस्वस्थ वाटत होतं आणि मळमळ होत होती. त्या मॅचपूर्वी तिला उलट्या झाल्या. “मी ऑलिम्पिक व्हिलेजमधील सर्व प्रिशक्षण सत्रांसाठी भारताची अधिकृत जर्सी घातली होती. ५ ऑगस्टच्या सामन्यापूर्वी मला बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी भारताची अधिकृत जर्सी घालून जातीए की नाही याची खात्री करू शकली नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची अधिकृत जर्सी न घातल्याबद्दल मी कुस्ती महासंघ आणि IOA ची माफी मागते,” असं तिने म्हटलंय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat responded to allegations hurled by the wrestling federation of india hrc
First published on: 16-08-2021 at 11:33 IST