भारताच्या विनेश फोगट (४८ किलो) व साक्षी मलिक (५८ किलो) यांनी शनिवारी भारताला ऐतिहासिक यश मिळवून दिले. दुसऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक आणि साक्षीने रौप्यपदक जिंकून रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमधील भारताचा दोन खेळाडूंचा कोटा निश्चित केला. भारताच्या दोन महिला प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. लंडन ऑलिम्पिकला गीता फोगट ही एकमेव महिला कुस्तीपटू पात्र ठरली होती.
विनेशने पहिल्या लढतीत युक्रेनच्या नतालिया पुल्कोवस्काचा १०-० असा धुव्वा उडवला. मग तिने फ्रान्सच्या ज्युली मार्टिन सबातीवर ११-० असा दणदणीत विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिने दक्षिण कोरियाच्या युमी ली हिचा ११-१ असा धुव्वा उडवला. विनेशने उपांत्य फेरीत टर्कीच्या एविन देमिरानला १२-२ असे हरवले. तर अंतिम फेरीत पोलंडच्या इवोना मातकोवस्काला ६-० असे हरवले.
साक्षीने सुरुवातीच्या कुस्तीत स्पेनच्या एरिनी गरिदोवर १०-० असा दणदणीत विजय मिळवला. मग रुमानियाच्या कॅटरिना झादेतेवस्कावर १२-२ असा तांत्रिक विजय मिळवला. माजी विश्वविजेत्या झांगविरुद्ध साक्षीची १०-१० अशी बरोबरी झाली. मात्र एकाच टप्प्यात ४ गुण मिळवल्याने साक्षीला विजयी घोषित करण्यात आले. साक्षीला चीनच्या लान झांगविरुद्ध संघर्ष करावा लागला. मात्र तांत्रिक गुणांआधारे साक्षी विजयी झाली. अंतिम फेरीत रशियाच्या व्हॅलेरिया झोलोबोवाने साक्षीवर ७-३ अशी मात केली.
पहिल्या पात्रता स्पर्धेत ४०० ग्रॅम्सने वजन जास्त भरल्यामुळे विनेशला स्पर्धेतून बाद व्हावे लागले होते. भारतीय कुस्ती महासंघाने तिला ताकीद देत पुन्हा पात्रता स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली.

पहिल्या स्पर्धेत बाद व्हावे लागल्यानंतर मी निराश झाले होते. दुसऱ्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाल्यानंतर सोनेरी कामगिरी करण्याचेच माझे ध्येय होते व ते लक्ष्य पार केले, याचा मला खूप आनंद झाला आहे.
– विनेश फोगट

अंतिम फेरीत जरी मला पराभव स्वीकारावा लागला असला तरी ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवल्याबद्दल मला खूप समाधान झाले आहे. बल्गेरियातील विशेष सराव आत्मविश्वास उंचावणारा ठरला.
– साक्षी मलिक