९०च्या दशकात भारताचा भविष्यातील स्टार खेळाडूंपैकी एक म्हणून उभारी घेत असलेला विनोद कांबळी मात्र अपेक्षेप्रमाणे प्रसिद्धी मिळवू शकला नाही. भारताच्या अनेक खेळाडूंप्रमाणे विनोद कांबळीदेखील काऊंटी क्रिकेट खेळत असे. तो यॉर्कशायरच्या संघाचा भाग होता. यॉर्कशायरच्या संघातील त्याचे जुने मित्र अजूनही त्याची आठवण काढतात. आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा विनोद कांबळी भारतासाठी ‘Next Big Thing’ मात्र ठरू शकला नाही. कांबळीही त्या काळात मिळालेल्या प्रसिद्धीच्या आहारी गेला आणि सगळं उद्धवस्त करून बसला.
यॉर्कशायर काऊंटी संघासाठी खेळणारा सचिन हा पहिला विदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला होता. सचिनचा जिवलग मित्र असलेला विनोद त्यावेळी एका छोट्या क्लबचं प्रतिनिधित्व करत होता. या क्लबसाठी खेळताना विनोदने दिमाखदार प्रदर्शन केलं आणि संघातले अनेकजण त्याचे चांगले मित्र झाले.
विनोद कांबळीसह क्रिकेट खेळणारे त्याचे सहकारी आणि त्याच्याविरूद्ध खेळलेल्या अनेक जणांनी कांबळीच्या दारूचं व्यसन आणि बिघडलेल्या तब्येतीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. त्यांच्या अनेक क्रिकेटमधील मित्रांनी त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दलचे रिपोर्ट आणि मुलाखतींमध्ये बोलतानाचा त्याचा संघर्ष पाहून सातत्याने एकच प्रश्न विचारत होते की, “कांबळीला नेमकं काय झालंय?”
नासा हुसेन ब्रॅडफोर्डमधील पार्क अव्हेन्यू मैदानाचे मुख्य ग्राउंड्समन आहेत. या मैदानावर भारतीय आणि पाकिस्तान वंशाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. कांबळीप्रमाणेच तेही आता पन्नाशीत आहेत. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते देखील क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न मनात बाळगून होते.

कांबळी तेव्हा १९ वर्षांचा होता पण त्याच्यात एका अनुभवी कसोटीपटूसारखाच उत्साह होता, असं हुसेन सांगत होते. “दक्षिण आशियाई भागातील खेळाडू म्हणून, सचिन यॉर्कशायरमध्ये येणं ही मोठी गोष्ट होती. सचिन जेव्हा काऊंटी खेळण्यासाठी आला होता, तेव्हा त्याच्यासह त्याचा मित्र विनोद कांबळीला घेऊन आला होता, जो आमच्या लीगमध्ये खेळला होता. मी कधीही असा खेळाडू पाहिला नाही जो चेंडूवर इतक्या आक्रमकपणे फटके खेळायचा,” असं हुसैन यांनी सांगितलं.
नासा यांनी अजूनही विनोद कांबळीला टाकलेला पहिला चेंडू आठवतोय. याबद्दल सांगताना नासा हुसैन म्हणाले, “त्याने डाऊन द ट्रॅक येऊन पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि यावेळी तुम्ही विचार करता की, ठीक आहे. भारताचा एक युवा खेळाडू आहे, ज्याला याआधी कधीच पाहिलं नाही, कधी त्याच्याबद्दल ऐकलं नाही आणि तो येऊन असे आक्रमक फटके खेळतो. त्यानंतर त्याने इंग्लंडविरूद्ध दोन द्विशतकं झळकावली. त्याच्यात एक कमालीचं टॅलेंट होतं.” पुढे नासा म्हणाले, “आताच्या घडीला तो एक करोडपती असता.”
विनोद कांबळी त्याकाळी यॉर्कशायर क्रिकेटची दंतकथा झाला होता, त्याच्या नावाला वलय होतं. कांबळीच्या आयुष्यात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडल्या, त्यातल्या काहींचा त्याला पश्चात्ताप होत असावा. जवळजवळ उपखंडातील ४०० खेळाडूंना इंग्लंडमध्ये आणण्याची जबाबदारी असलेल्या सॉली अॅडम यांच्या खजान्यात अशा अनेक गोष्टी आहेत.
सोली एडम हा क्रिकेटचं वेड असणारे जणू एक व्यावसायिक आहे. एडम हा कांबळी ज्या संघासाठी खेळला त्या संघाचा कर्णधार देखील होता. एकावेळाला सुमारे १० ते १५ भारतीय क्रिकेटपटूं सोली एडमच्या घरी असत. बरेच जण तिथेच राहत असत; तर काहींना फक्त जेवणासाठी येण्याची सवय होती. क्लबकडून मिळणारे पैसे पुरेसे नसल्याने अनेक जण दिवसा कामाला देखील जात असत. काही जण सोलीच्या इंधन पंपावर, कारखान्यात किंवा शॉपिंग सेंटरमध्ये काम करायचे.
सोली कांबळीबद्दल सांगताना म्हणाला, एक दिवस आम्ही १० क्रिकेटपटू असे बसलो होतो. त्यामधील सचिन आणि विनोद सोडता सर्वांकडे पार्ट टाईम जॉब होते. मुंबईच्या एका क्रिकेटपटूने विनोद कांबळीला म्हटलं, तुला सामन्यामधून फक्त २ पाऊंड मिळतात, तू सोलीच्या इथे नोकरी का करत नाहीस? कांबळीने यावर क्षणाचाही विलंब न लावता लगेच उद्गारला, मी आणि सचिन कसोटी क्रिकेट खेळून पैसू कमवू, पार्ट टाईम जॉब करत मला माझं लक्ष विचलित करून घ्यायचं नाही. किती आत्मविश्वासाने तो बोलला होता, त्यावेळेस तो खूप तरूण होता आणि कसोटी क्रिकेटपटू होण्यापासून तर खूप लांब होता, पण त्याच्यात आत्मविश्वास कमालीचा होता.
सोलीच्या बियाँड बाऊंड्रीज या पुस्तकात विनोद कांबळीची चमकदार फलंदाजी आणि मैदानाबाहेरील त्याचे खडतर जीवन यावर संपूर्ण प्रकरण त्यांनी लिहिलं आहे. सोली यांचे मित्र भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या सांगण्यावरून त्याने कांबळीला स्पेन व्हिक्टोरिया क्रिकेट क्लबसाठी करारबद्ध केले होते. जेव्हा विनोद क्लबमध्ये आला तेव्हा त्याची पहिल्याच प्रयत्नात चांगली छाप पडली नाही. कांबळी एक साधारण किशोरवयीन मुलगा होता. त्याची शरीरयष्टी पाहून कोणीही म्हणू शकत नव्हतं की तो एक आक्रमक फलंदाज आहे. “त्याचे हात कोंबडीच्या पायांसारखे आहेत,” असे एक जण त्याला पाहून म्हणाला.
विनोद कांबळीच्या शानदार पहिल्या हंगामासाठी त्याला ७०० पाऊंडचा बोनस मिळाला. सोली मुंबईला जायचा आणि कांबळीच्या वडिलांकडे ते पैसे द्यायचा. हे पाहून कांबळीचे वडिल म्हणाले होते की, मी इतके पैसे पाहिलेही नव्हते, असं सोलीने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे. “पण, नंतर विनोदने भारतात परतल्यावर त्याच्या वडिलांकडून सर्व पैसे घेतले आणि ते त्याच्या मित्रांबरोबर खर्च केले. विनोदने कधीही पैशांची पर्वा केली नाही, किंवा त्याला वस्तूंबद्दल आदर नव्हता”.
सोलीने पुस्तकात पुढे लिहिलंय, “त्या हुशार मुलाच्या या विचित्र प्रवासाचा” विचार करतो तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. कांबळी अनेकदा इंग्रजी माध्यमांमध्ये सोलीचा उल्लेख “त्याचे वडील” असा करत असे त्यामुळे कांबळीची स्थिती पाहता सोलीला खूप वाईट वाटतं. “मी विनोदशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. पण दुर्दैवाने, मला त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जर कदाचित कधी विनोदने ह पुस्तक पाहिलं तर त्याला कळावे की आम्हा सर्वांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे… विनोद, आम्हाला सर्वांना तुझी आठवण येते!