Vinod Kambli Brother Gives Health Update: भारतीय क्रिकेट संघाचे माजी डावखुरे फलंदाज विनोद कांबळी प्रकृती ठिक नसल्याचं त्यांचे भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळीच्या तब्येतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि काही महिन्यांनंतर त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचं देखील समोर आलं होतं.
विनोद कांबळीवर रूग्णालयात उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला, परंतु त्यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे ठिक झालेली नाही. विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्र म्हणाला की त्याला बोलताना त्रास होत आहे, पण माझा भाऊ फाईटर आहे आणि तो यातून बाहेर येईल, अशी खात्रीदेखील त्यांना आहे.
विनोद कांबळीच्या भावाने दिले माजी क्रिकेटपटूचे हेल्थ अपडेट
वीरेंद्र कांबळी यांनी द विकी लालवानी शोमध्ये सांगितलं की, “विनोद सध्या घरी आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत. त्यांना बोलताना त्रास होत आहे आणि नीट चालतही येत नाहीत. त्याला बरं होण्यासाठी वेळ लागेल, पण तो एक चॅम्पियन आहे आणि पुनरागमन करेल, अशी खात्री आहे. तो पुन्हा पूर्वीसारखा चालायला सुरूवात करेल, अशी आशा आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आशा आहे की तुम्ही त्याला पुन्हा मैदानावर पाहाल.”
वीरेंद्र कांबळी यांनी ५३ वर्षीय विनोद कांबळी यांच्या उपचारांची माहिती दिली आणि चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. त्यांनी सांगितलं की,”विनोद १० दिवसांसाठी पुनर्वसन केंद्रात होते, जिथे त्यांची मेंदू स्कॅन आणि यूरिन टेस्टसह संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली. टेस्ट रिपोर्ट चांगले आहेत आणि फारश्या समस्याही नाहीत. तो चालू शकत नसल्याने त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देण्यात आला.”
“विनोदला अजूनही स्पष्ट बोलता येत नाहीये. मी चाहत्यांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा. त्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे”, असं अखेरीस विनोद कांबळीचा भाऊ म्हणाला.