ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : विराट कोहलीच्या खांद्यावरील नेतृत्वाचे ओझे आता कमी झाले आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत तो पूर्वीप्रमाणे बिनधास्त खेळला, तर दक्षिण आफ्रिकेसाठी ते अधिक धोकादायक ठरेल, असे मत माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सने व्यक्त केले.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कोहलीने भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या भारत-आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे ५२ वर्षीय ऱ्होड्सने सांगितले. लेजंड्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ऱ्होड्स डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील शेष विश्व संघातून खेळणार आहे.

‘‘यापूर्वी कधीही भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी आफ्रिका दौऱ्यावर आला की त्यांना पराभवच पत्करावा लागणार, हे निश्चित असायचे. परंतु यंदा प्रथमच भारताला कसोटी मालिका विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. कोहलीच्या नेतृत्वाला याचे श्रेय जाते. परंतु प्रतिकूल स्थितीतही आफ्रिकेने कमाल केल्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला,’’ असे ऱ्होड्स म्हणाला.

‘‘कोहली अद्यापही फलंदाजीच्या बळावर भारताला एकहाती सामने जिंकवून देऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची गरज आहे. तो आता भारताचा कर्णधार नसल्याने आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तसेच यापुढेही फलंदाजीच्या बळावर अधिक धोकादायक ठरेल,’’ असे ऱ्होड्सने सांगितले. याव्यतिरिक्त, आधुनिक क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ अन्य संघांच्या तुलनेत क्षेत्ररक्षणात अधिक वरचढ वाटतो, असे विख्यात क्षेत्ररक्षक ऱ्होड्सने नमूद केले.

लेजंड्स लीगला आजपासून प्रारंभ

मस्कत : लेजंड्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या (एलएलसी) पहिल्या हंगामाला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. ओमान येथे खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत भारतीय महाराजा, आशिया लायन्स आणि शेष विश्व हे तीन संघ सहभागी होणार आहेत. २९ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी क्रीडा वाहिनी आणि सोनी लिव्ह अ‍ॅपवर करण्यात येईल. गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या लढतीत वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखालील भारतीय महाराजा संघासमोर मिस्बाह उल हकच्या आशिया लायन्स संघाचे आव्हान असेल.