IND vs AUS 4th Test Match Updates: अहमदाबादमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये आपला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये कोहलीने १२०५ दिवसांनी शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने या शतकाच्या जोरावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
यापूर्वी विराट कोहलीने २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्याने आता आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक २४१ चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने केवळ ५ चौकार मारले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकूण ५६ वे शतक आहे.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला –
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७५ वे शतक आहे. त्याने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. कोहलीच्या आधी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ५६६ डावांत ७५ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५५२ डावांत हा पराक्रम केला. अशा पद्धतीने विराटने मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीने अत्यंत शांत स्वभावाने आपले शतक साजरे केले. १०० धावा केल्यानंतर, त्याने आपल्या गळ्यातील अंगठी काढून चुंबन घेतले आणि आपले शतक पत्नी अनुष्का शर्माला समर्पित केले.
चौथ्या कसोटीत विराट कोहली खूप संयमाने फलंदाजी करताना दिसला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर कोहलीने ५९ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात स्टीव्ह स्मिथने कोहलीविरुद्ध अनेक डावपेच आखले, पण कोहलीच्या संयमापुढे सगळेच फिके पडले. पहिल्या सत्रात कोहलीच्या बॅटमधून केवळ २९ धावा निघाल्या, ज्यासाठी त्याने ९२ चेंडूंचा सामना केला.
चौथ्या कसोटीचा चौथा दिवस –
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली. कांगारू संघाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाची फलंदाजीही सुरू आहे. भारताने आतापर्यंत १६०षटकानंतर ५ गडी गमावून ४८० धावा केल्या आहेत. विराट कोहली १४३ आणि अक्षर पटेल ३८ धावांवर खेळत आहेत.