Virat Kohli Ranking: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी विराटने कसोटी क्रिकेटलाही रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. दोन फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या विराटचा आयसीसीच्या रँकिंगमध्ये दबदबा पाहायला मिळाला आहे. विराटने असं काही करून दाखवलं आहे, जे याआधी कोणालाच करता आलं नव्हतं.
आयसीसीने १६ जुलैला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटची रँकिंग जाहीर केली आहे. ही रँकिंग जाहीर होण्याआधी विराटचे रेटींग पॉईंट ८९७ होते. तर रँकिंग जाहीर झाल्यानंतर विराटचे रेटिंग पॉईंट हे ९०० च्या पार गेले आहेत. त्याची टी-२० क्रिकेटमधील रेटींग ही ९०९ झाली आहे.
असा रेकॉर्ड करणारा विराट पहिलाच फलंदाज
विराट कोहली हा क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये ९०० पेक्षा अधिक रेटींगची कमाई करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी जगातील कुठल्याही फलंदाजाला तिन्ही फॉरमॅटमध्ये ९०० पेक्षा अधिकची रेटींग मिळवता आलेली नाही. विराटने वनडे क्रिकेटमध्ये ९३७ रेटींग मिळवली होती. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ९११ रेटींग मिळवली होती.
आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ९०९ रेटींगची कमाई केली आहे. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० पेक्षा अधिकची रेटींग मिळवणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे.याआधी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला टी-२० क्रिकेटमध्ये ९०० पेक्षा अधिकची रेटींग मिळवता आली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० पेक्षा अधिक रेटींग मिळवणारे फलंदाज
डेव्हिड मलान ( इंग्लंड)- ९१९ रेटींग
सूर्यकुमार यादव (भारत)- ९१२ रेटींग
विराट कोहली ( भारत)- ९०९ रेटींग
आरोन फिंच ( ऑस्ट्रेलिया) – ९०४ रेटींग
बाबर आझम ( पाकिस्तान ) – ९०० रेटींग