भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फलंदाजी ओळखला जातो. त्याचसोबत त्याच्या फिटनेससाठीही अनेकांचा तो आदर्श आहे. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर असो, तो कायमच उत्साही असतो. त्याच्यामुळे अनेकांना फिटनेसचे धडे घ्यावेसे वाटतात. पण स्वत: कॅप्टन कोहली मात्र फिटनेसच्या बाबतीत फुटबॉलपटूंना आपला आदर्श मानतो.
“आम्ही सारे शिस्तबद्धतेसाठी फुटबॉलपटूंकडे पाहतो. त्यांच्यात कमालीची शिस्त आणि फिटनेस असतो. मूळात ते त्यांच्या तंदुरुस्तीकडे अत्यंत शिस्तीने लक्ष पुरवतात. कोणताही खेळ खेळण्यासाठी जेव्हा खेळाडू मैदानात उतरतो, तेव्हा त्याला सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे तंदुरूस्ती… फुटबॉलपटू त्यांच्या खेळाबाबत खूपच गंभीर असतात. त्यांच्या शारीरिक गरजा, न्यूट्रीशन, विश्रांतीचा वेळ याबाबत ते कधीही तडजोड करत नाहीत. त्यांच्याकडून तंदुरूस्तीसाठी पाळण्यात येणारी शिस्त अत्यंत गरजेची आहे”, असे विराट म्हणाला.
“क्रिकेट आणि फुटबॉल या दोन खेळातील फिटनेसची तुलना करणे चुकीचे ठरेल. क्रिकेटमधील केवळ वेगवान गोलंदाजांच्याच फिटनेसची तुलना फुटबॉलपटूंशी करता येईल. त्याव्यतिरिक्त इतर खेळाडूंच्या फिटनेसपेक्षा फुटबॉलपटूच अधिक तंदुरुस्त असतो. क्रिकेटमध्ये फुटबॉलइतका फिटनेस गरजेचा नसतो. फुटबॉल हा चपळतेचा खेळ आहे. तो खेळ ९० मिनिटांत खेळला जातो. त्यामुळे त्या खेळावर तुमचे नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला प्रचंड तंदुरूस्त असणे आवश्यक असते. जर क्रिकेटपटूंने त्या स्तराचा फिटनेस ठेवला, तर क्रिकेटचा खेळ एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जाता येईल”, असा विश्वास विराटने व्यक्त केला.
दरम्यान, भारताची २ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघात उमेश यादवला संधी मिळाली आहे. बुमराहच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.