श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवला. विराट कोहलीने पांडेसोबत भारतीय संघाला विराट विजय मिळवून दिला. या सामन्यात कोहलीने ८२ धावांची खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्टीय सामन्यात १५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट ७ वा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन प्रकारात मिळून १५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीने ३३३ डावांत हा करिश्मा आपल्या नावे केला असून जलदपणे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. यापूर्वी ३३६ डावांत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने १५ हजार धावा पूर्ण करण्याचा करिश्मा केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३३ खेळाडूंनी १५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
या सामन्यात कोहलीने ब्रॅडन मॅक्युलमला मागे टाकले. मॅक्युलमने टी-२० च्या मैदानात धावांचा पाठलाग करताना १००६ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढून विराट टी-२० च्या मैदानात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विराटच्या नावावर १०१६ धावा जमा झाल्या आहेत. कोहलीच्या सातत्यपूर्ण खेळीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. एका नेटिझनने विराट कोहलीच्या तिन्ही प्रकारातील धावांची सरासरी सांगत त्याच्या खेळाचे कौतुक केले. कोहलीने कसोटीत ६१.४१, वन-डेमध्ये ६७.१० तर टी-२० मध्ये ८४.६६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.