भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. त्याने नेहमी टीम इंडियाचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला आपले आदर्श मानले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने सचिन तेंडुलकरला आदर्श का मानतो. तसेच सचिन त्याच्यासाठी प्रेरणास्थान का आहे हे सांगितले. विराट कोहली फाउंडेशनने या मुलाखतीची एक छोटीशी क्लिप आपल्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड केली आहे.

मुलाखतीत विराटला, आपले प्रेरणास्थान कोण आहेत? असे विचारण्यात आले. विराट कोहलीने या प्रश्नाचे उत्तर देताना विचार केला आणि म्हणाला, “हा खूप कठीण प्रश्न आहे पण क्रिकेटच्या संदर्भात सचिन तेंडुलकर ही माझी सर्वात मोठी प्रेरणा होती. मी त्याच्यामध्ये एक गुण पाहिला जो इतर कोणत्याही खेळाडूमध्ये दिसत नव्हता. सचिन नेहमी परिस्थितीकडे न पाहता परिणामांकडे पाहत असे आणि माझ्यासाठी हीच मला प्रेरणा देणारी सर्वात मोठी गोष्ट होती. म्हणून मी त्याचा खेळण्याचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करायचो.”

सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेटचा प्रत्येक विक्रम आहे आणि विराट कोहलीनेही हाच मार्ग अवलंबला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढले आणि एकदिवसीय ते कसोटी फॉरमॅटपर्यंत सर्वत्र आपले नाव कोरले. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर २००९ ते २०१३ पर्यंत एकत्र टीम इंडियाचा भाग होते.