श्रीलंकेचा माजी क्रिकेटस्टार सनथ जयसुर्याने भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहीलचे कौतुक करताना कोहलीचे प्रभावी नेतृत्त्व हिच भारतीय संघाच्या विजयाची गुरूकिल्ली असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघ योग्य लयीत असून इंग्लंडसारख्या मातब्बर संघावर भारतीय संघाने सहज विजय प्राप्त केल्याचे जयसुर्या म्हणाला. विराट कोहीलच्या कर्णधारी गुणांचे कौतुक करताना तो म्हणाला की, कोहली उत्तम कर्णधार आहे आणि तो गोलंदाजांचा वापर अतिशय योग्यरित्या करतो. तो स्वत: देखील चांगली कामगिरी करत आहे. जेव्हा संघाचा कर्णधार प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतो तेव्हा संघातील खेळाडूंना आत्मविश्वास मिळतो आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय प्राप्त करता येतो.

पुढील विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या दावेदारीबाबत जयसुर्याला विचारले असता त्याने मिश्किलपणे श्रीलंकेचे नाव घेतले. भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतकी कामगिरी करणाऱय़ा भारताच्या करुण नायरच्या खेळीनेही जयसुर्या प्रभावित झाला. त्रिशतक झळकावणे काही सोपी गोष्ट नाही. अशी ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी तुमच्याकडे संयम आणि चिकाटी असणे गरजेचे असते, असे जयसुर्या म्हणाला.

वाचा: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोहलीच्या टीम इंडियाला यंदा ‘बक्षिसी’ नाही

 

भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचीही जयसुर्याने प्रशंसा केली. अनिलने संघाचा प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या करिअरला नुकतीच सुरूवात केली आहे. अनिल सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता. प्रशिक्षकाच्या करिअरमध्येही अनिल खूप चांगली कामगिरी करेल, असे जयसुर्या म्हणाला. दयाल फाऊंडेशनतर्फे आयोजित पाटणा येथील एका कार्यक्रमात जयसुर्या उपस्थित होता. त्यावेळी जयसुर्याने आपले मत व्यक्त केले. जयसुर्यासोबतच भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी सदस्य सबा करिम देखील उपस्थित होते.

सबा करिम यांनी करुण नायरच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले की, करुण नायरचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यांतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने संघात स्थान मिळवले आणि संघासाठी त्रिशतकी खेळी साकारून मिळालेल्या संधीचे सोने देखील केले. इंग्लंडसारख्या तगड्या संघाविरुद्ध त्रिशतकी खेळी साकारणे खूप मोठी गोष्ट आहे.