भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज ३५ वर्षांचा झाला  आहे. रोहितच्या वाढदिवसानिमित्त त्याला क्रिकेट जगताकडून आणि त्याच्या चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा मिळत आहेत. आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रोहितने असे अनेक विक्रम केले आहेत, जे मोडणे जवळपास अशक्य आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही सध्याचा कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहली २०१४ ते २०२२ पर्यंत भारताचा पूर्णवेळ कर्णधार होता. विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या सहकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ३३ वर्षीय विराटने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये तो रोहितला मिठी मारताना दिसत आहे. कोहलीने फोटोला कॅप्शन देत, “हॅपी बर्थडे रोहित शर्मा, गॉड ब्लेस,” असे म्हटले आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक गोड संदेश पोस्ट केला आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये रोहित त्याची मुलगी समायरासोबत दिसत आहे. रितिकाने फोटोंना कॅप्शन देत, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. सॅमी आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमच्यासाठी असल्याबद्दल धन्यवाद. हकुना मटाटा,” असे म्हटले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा जगातील एकमेव फलंदाज रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात झाला. २०१३ मध्ये एमएस धोनीने त्याला सलामीवीर बनवताच त्याच्या कारकिर्दीचा आलेख इतका उंचावला की तो सध्या संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०९, २६४ आणि २०८ धावा करणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे.

रोहित शर्माने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याला गोलंदाज व्हायचे होते. रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑफस्पिनर म्हणून केली होती. त्यावेळी रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड होते आणि त्यांनी रोहितच्या फलंदाजीकडे लक्ष दिले आणि त्यालाही याकडे लक्ष देण्यास सांगितले.

२००७ मध्ये, रोहितने आयर्लंड दौऱ्यावर भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. त्याने ५० धावांची खेळी खेळली. त्याच वर्षी टी-२० विश्वचषकाच्या संघातही त्याची निवड झाली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहितने १६ चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.