रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन संघ आयपीएलमधले अयशस्वी संघ मानले जातात. दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. विराट कोहलीसारखा खमका कर्णधार असतानाही RCB आयपीएलमध्ये आतापर्यंत अयशस्वी ठरत आली आहे. २०१९ च्या हंगामातली RCB ची कामगिरी यथातथाच होती. मात्र नवीन हंगामात संघातील काही खेळाडूंमुळे RCB ला विजेतेपद पटकावण्याची चांगली संधी असल्याचं मानलं जातंय. RCB चा संघ हा प्रामुख्याने कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सवर अवलंबून असतो. परंतू यंदाच्या हंगामासाठी RCB ने ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरोन फिंचला संघात घेतलं आहे. गरज पडल्यास फिंच आणि डिव्हीलियर्स सारखे खेळाडू विराटवरचा भार कमी करु शकतात असे संकेत संघाचे प्रशिक्षक सायमन कॅटीच यांनी दिले आहेत.

“लिलावादरम्यान आम्ही फॉर्मात असलेल्या खेळाडूंच्या शोधात होतो. उपलब्ध खेळाडूंच्या यादीत फिंच आम्हाला मिळाला. ऑस्ट्रेलियन वन-डे संघासाठी त्याने केलेली कामगिरी ही खरचं वाखणण्याजोगी आहे. टी-२० मध्ये तो चांगली फलंदाजी करतो. फिरकीपटूंना चांगल्या पद्धतीने खेळण्याचं कसब त्याच्याकडे आहे. त्याच्या नेतृत्वगुणांचा संघाला चांगलाच फायदा होऊ शकतो. फिंच-डिव्हीलियर्स यासारखे खेळाडू विराटवरचा भार कमी करु शकतात.” कॅटीच इंडियन एक्सप्रेसशी बोलत होते.

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाची स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. RCB चा संघ युएईत दाखल झाला असून काही खेळाडूंनी हॉटेलमध्ये जमेल त्या पद्धतीने सराव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली संघ यंदा कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.