वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या क्रिकेट प्रसाशसकीय समितीची मुदत संपली आणि निवडणुकांनंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या हातात बीसीसीआयचं अध्यक्षपद आलं. सौरव गांगुली आल्यानंतरही बीसीसीआयच्या कारभारामध्ये काही बदल होतील अशी अनेकांना आशा होती. सुरुवातीला प्रशासकीय पातळीवर काही बदल दिसलेही. परंतू ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान रोहित शर्माच्या निवडीवरुन निर्माण झालेला संभ्रम आणि बीसीसीआयचं याप्रकरणी भूमिका स्पष्ट न करणं सगळं काही आलबेल नसल्याचं सांगून जातंय. रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूच्या निवडीवरुन एवढा वादंग झाल्यानंतरही बीसीसीआय समोर येऊन भूमिका स्पष्ट करणार नसेल तर खरंच आश्चर्य वाटायला हवं. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेलं बीसीसीआय संघातील घडामोडींबद्दल संवाद साधण्याची वेळ येते तेव्हा अगदीच मागासलेल्या बोर्डांप्रमाणे वागतं. नेमका वाद आहे तरी काय?? आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत सुरु असताना सुनिल जोशी यांच्या निवड समितीने भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवड केली. लॉकडाउनपश्चात भारतीय संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असल्यामुळे सर्वांचं या संघनिवडीवर लक्ष होतं. परंतू निवड समितीने एकाही संघात रोहित शर्माला जागा न देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पंजाबविरुद्ध सामन्यात रोहित शर्माला झालेल्या दुखापतीचं कारण देत निवड समितीने रोहित शर्माला संघात स्थान नाकारलं होतं. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर साहजिकच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतू संभ्रमाचं वातावरण तयार झालं ज्यावेळी संघनिवडीनंतर रोहित शर्मा सरावासाठी मैदानात उतरल्याचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. अवश्य वाचा - रोहित आमच्यासोबत का नाही याचं कारण मलाही माहिती नाही - विराट कोहली हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनी रोहित जर दुखापतग्रस्त असेल तर तो सराव कसा करतोय आणि मैदानात काय करतोय असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. इतकच नव्हे तर काही दिवसांनी हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून रोहितने पुनरागमनही केलं. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करताना रोहितने मुंबई इंडियन्सला पाचवं विजेतेपद मिळवून देण्यासही मदत केली. ज्यामुळे रोहितला ऑस्ट्रेलिया संघात स्थान न मिळणं अधिक खटकायला लागलं आणि बीसीसीआयच्या भूमिकेवर शंका निर्माण झाली. फिजीओ नितीन पटेलांचा तो अहवाल आणि बीसीसीआयची भूमिका - भारतीय संघाची निवड होण्याआधी संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहितच्या दुखापतीची तपासणी करत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागेल असं सांगितलं होतं. याच अहवालाच्या आधारावर निवड समितीने रोहितचा संघ निवडीसाठी विचार केला नाही. रोहितला संघात स्थान न मिळाल्याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रसारमाध्यमांमध्ये रोहित ७० टक्केच फिट असल्याचं सांगितलं. त्याला फिट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असं म्हणत गांगुली यांनी रोहितला आयपीएलचे सामने न खेळण्याचाही सल्ला दिला. बीसीसीआय अध्यक्षांच्या स्टेटमेंटनंतरही रोहितने आयपीएल सामने खेळण्याला प्राधान्य दिल्यामुळे BCCI चे अधिकारी व काही माजी खेळाडू त्याच्यावर नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. परंतू मैदानातला रोहितचा वावर पाहता त्याची दुखापत इतकी गंभीर असेल हे जाणवलं नाही. त्यातच आयपीएलमधलं अर्थकारण लक्षात घेता रोहित शर्मा न खेळणं मुंबई इंडियन्स संघाला परवडणारं नव्हतं. तेराव्या हंगामाचा अंतिम सामना पार पडल्यानंतर बीसीसीआयने संघात काही बदल करत रोहित शर्माला कसोटी संघात स्थान दिलं. तसेच टी-२० संघात पहिल्यांदा स्थान मिळालेल्या KKR च्या वरुण चक्रवर्तीऐवजी टी. नटराजनला स्थान देण्यात आलं. वरुण चक्रवर्तीलाही आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. चक्रवर्ती गोलंदाजी करत असताना त्याला त्रास जावणत नव्हता, परंतू बॉल थ्रो करताना त्याच्या खांद्याला वेदना होत होती. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरुणच्या या दुखापतीबद्दल बीसीसीआयला संघाची घोषणा झाल्यानंतर समजलं.ज्यामुळे त्याला संघातून वगळून नटराजनला संघात स्थान देण्यात आलं. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, रोहित मात्र NCA मध्ये - आयपीएलच्या अंतिम सामन्यातला खेळ पाहता रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होईल अशी सर्वांना आशा होती. परंतू प्रत्यक्षात असं काही झालं नाही. रोहित शर्मा आपल्या परिवारासह भारतात परतला आणि त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) त येऊन फिटनेसवर भर द्यायला सुरुवात केली. एकीकडे भारतीय संघ सिडनीत सराव करत असताना रोहितच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. बीसीसीआयचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना बातम्या पुरवत राहिले. ज्यामुळे संभ्रम आणखीनच वाढला आणि रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी होणार की नाही हे अखेरच्या क्षणापर्यंत पक्क झालं नाही. ताकीद देऊनही रोहित शर्मा आयपीएल सामने खेळल्यामुळे नाराज झालेले बीसीसीआयचे अधिकारी, रोहितची दुखापत हा अहंकाराचा मुद्दा तर बनवत नाहीयेत ना असाही सवाल सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली. रोहित शर्माला झालेली दुखापत ही फारशी गंभीर नसेल आणि गांगुली यांच्या म्हणण्यानुसार तो ७० टक्केच फिट असेल तर कसोटी मालिकेचा विचार करता रोहितला ऑस्ट्रेलियात का पाठवण्यात आलं नाही असा प्रश्न तयार होतो. सिडनीत भारतीय संघासोबत राहून संघाचे फिजीओ, डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित आपल्या फिटनेसवर काम करु शकला असता. रोहितला NCA मध्ये बोलवून बीसीसीआय नेमकं काय साध्य करु पाहते आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत याआधी आलेले खेळाडू व त्यांचा फिटनेस रेकॉर्डचा इतिहास तपासला असता.बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीचा मुद्दा अवास्तव वाढवला असंच दिसतंय. विराटकडून BCCI चं पोस्टमार्टम - पहिल्या वन-डे सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या दुखापतीबद्दल तयार झालेल्या संभ्रमाच्या वातावरणावर भाष्य केलं. सुरुवातीला रोहित वन-डे आणि टी-२० मालिकेसाढठी उपलब्ध नसेल याची माहिती त्याला देण्यात आली होती. परंतू आयपीएलचे सामने खेळल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलियात आमच्यासोबत येईल असं वाटलं होतं.तो का आला नाही याचं कारण मला आजही माहिती नसल्याचं विराटने सांगितलं. त्याच्या दुखापतीबद्दल NCA कडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नसल्याचं सांगत विराटने BCCI च्या कम्युनिकेशन एररवर बोट ठेवलं. आजही बीसीसीआयने ११ डिसेंबरला रोहितची फिटनेस टेस्ट करणार असल्याचं समजतंय. रोहित आणि इशांतसाठी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधीचा नियम शिथील करता येईल का?? अशी विचारणार केली आहे. प्रश्न रोहितच्या दुखापतीचा किंवा त्याला संघात स्थान न मिळण्याचा नाही. बीसीसीआयसारखी एक मोठी संस्था संघातील महत्वाच्या खेळाडूला झालेल्या दुखापतीबद्दल घेत असलेल्या संशयास्पद भूमिकेचा आहे. येत्या काळात बीसीसीआय याप्रकरणावरचा पडदा उठवेल एवढीच काय ती आशा.