माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा भारताचा एक स्फोटक फलंदाज होता. त्याचा आक्रमकपणा हा प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारा होता. सेहवाग हा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या या त्रिशतकामागील कहाणी आणि काही आठवणी भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण याने आपल्या ‘281 and Beyond’ या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत.

वीरेंद्र सेहवागने पदार्पणाच्या आधीच कसोटीत त्रिशतक मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८१ धावा केल्या. ग्लेन मॅकग्राने त्याला बाद केल्यानंतर त्याचे त्रिशतक अवघ्या १९ धावांनी हुकले. त्याच वेळी सेहवागने लक्ष्मणला सांगितले होते की कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय मीच असेन आणि काही वर्षांतच त्याने हा पराक्रम करून दाखवला, अशी आठवण आत्मचरित्रात लक्ष्मणने लिहिली आहे.

मी, झहीर खान आणि सेहवाग तिघे पुण्याच्या सामन्याआधी जेवायला गेलो होतो. त्यावेळी सेहवाग मला म्हणाला की लक्ष्मणभाई, तुम्हाला त्रिशतक करण्याची संधी कोलकाताच्या सामन्यात होती, पण तुम्ही ती संधी गमावली. आता तुम्ही पाहाच… मी भारताकडून पहिले कसोटी त्रिशतक झळकावेन. त्याच्या या बोलण्याने मी अवाक झालो होतो. केवळ चार एकदिवसीय सामने खेळलेला आणि कसोटी संघात निवड होण्याच्या जवळपासही नसलेला माणूस असं बोलतोय हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. आम्हाला ती मजा वाटली पण सेहवाग गंभीरपणे बोलत होता, हे काही काळातच समोर आलं, असेही लक्ष्मणने लिहिले आहे.