Virendra Sehwag on Rohit Sharma Test Retirement: भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार असलेल्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत रोहितने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएलदरम्यान घेतलेल्या त्याच्या निर्णयाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. यादरम्यान सेहवागने रोहितच्या निवृत्तीबाबत त्याला शुभेच्छा देताना मोठी माहिती दिली आणि त्याच्या निवृत्तीबाबत आश्चर्य व्यक्त केलं.
६७ कसोटी सामने खेळणाऱ्या रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच वाईट गेला. यामुळे रोहितवर बरीच टीका झाली. तेव्हापासून रोहितच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल चर्चा सुरू होती. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने रोहितच्या कामगिरीबद्दल वक्तव्य केलं आणि तो इंग्लंड कसोटी खेळणार होता, याबाबत उल्लेखही केला.
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “मला नेहमीच वाटतं की तो आणखी थोडं खेळू शकला असता. रोहित शर्मा १०० कसोटी सामने खेळू शकला असता. संघाला टॉप ऑर्डरमध्ये त्याची उणीव भासेल. कारण तो जलद धावा काढण्यात माहीर होता, परंतु रोहित शर्माने घेतलेला निर्णयही योग्य आहे”.
पुढे सेहवाग म्हणाला, “मी आयपीएलदरम्यान असं ऐकलं होतं की, तो (रोहित शर्मा) इंग्लंड दौऱ्याकरता रणनिती आखत आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियामध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला नव्हता, तेव्हाही तो म्हणाला की मी कुठे जात नाहीये, मी इथेच आहे. मी निवृत्त झाल्यासारखं बोलू नका.”
सेहवागने पुढे हैराण होत वक्तव्य केलं, “पण मग यादरम्यान अचानक काय झालं. कदाचित झालं असं असेल की. निडकर्त्यांनी निर्णय घेतला असेल, त्यांनी ठरवलं असेल की, आपण रोहितला कसोटी कर्णधारपद देऊ शकत नाही किंवा त्याला खेळाडू म्हणूनही इंग्लंड दौऱ्यावर नेऊ शकत नाही. निवडकर्त्यांनी कदाचित रोहितशी आपल्या निर्णयाची चर्चा केली असेल आणि यानंतर त्याने कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असेल. जी चांगली गोष्ट पण आहे.”
टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला, “रोहित शर्मासारख्या खेळाडूची कोणाला आठवण येणार नाही. मग टी-२०, एकदिवसीय किंवा मग कसोटी क्रिकेट असो आम्हा सर्वांचे त्याने खूप मनोरंजन केले आहे. चाहते त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतात आणि त्याने जे विक्रम आपल्या नावे केले आहे ते उत्कृष्ट आहेत.”
सेहवाग पुढे म्हणाला, “मधल्या फळीतून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून कारकिर्दीला निरोप दिलाय. त्याने आपल्या नावे केलेल्या सर्व कामगिरी अद्भूत आहेत. त्यामुळे रोहितचे तुझे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” रोहित शर्माने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ६७ कसोटी सामन्यांमध्ये १२ शतकं आणि १८ अर्धशतकांच्या मदतीने ४३०१ धावा केल्या. तर त्याच्या नावे दोन कसोटी विकेट्सही आहेत.